पुसद : आईला करणी केल्याच्या संशयावरून एका वाहन चालकाचा खून केल्या प्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अनिल सुब्रम्हण्यम यांनी दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर याच प्रकरणातील पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कैलास श्रीराम चव्हाण (२४) व मधुकर किसन राठोड (४५) रा. दोघेही धुंदी अशी जन्मठेप झालेल्यांची नावे आहे. एका खासगी कंपनीत वाहन चालक असलेल्या प्रकाश तुकाराम राठोड याने कैलास चव्हाण याच्या आईला करणी केल्याचा संशय घेऊन वाद उभा केला. याच वादात ७ आॅगस्ट २०१० रोजी प्रकाश राठोड दुचाकीने पुसदकडे येत होता. त्यावेळी वाटेत अडवून त्याला कुऱ्हाड व लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून जागीच ठार केले. या प्रकरणी आरोपी कैलास श्रीराम चव्हाण, मधुकर किसन राठोड, लक्ष्मी किसन राठोड, शोभा मधुकर राठोड, सीमा रमेश राठोड, रमेश किसन राठोड, अतुल मधुकर राठोड या सात जणांवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. सुधाकर राठोड यांनी १५ साक्षीदार तपासले. त्यावरून दोष सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी कैलास चव्हाण व मधुकर राठोड यांना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड ठोठावला तर इतर पाच जणांची निर्दोष मुक्तता केली. (प्रतिनिधी)
चालकाच्या खुनात दोघांंना जन्मठेप
By admin | Updated: January 29, 2015 23:14 IST