रुग्णांना धोका : बंदोबस्त करण्याची मागणीपुसद : पुसद तालुक्याच्या ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. ग्रामीण जनतेची नाडी बोगस डॉक्टरांच्या हातात सापडली असून रुग्णांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठांनी तत्काळ लक्ष घालून या बोगस डॉक्टरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.पुसद तालुक्यात १८० गावे असून ११९ ग्रामपंचायती आहे. तालुक्याची लोकसंख्या जवळपास पाच लाखांच्या घरात पोहोचली आहे. पुसद तालुका हा तांडे, वाड्या, वस्त्यांचा असून डोंगरदऱ्यात पसरलेला आहे. याचा फायदा घेऊन सदर तथाकथित डॉक्टर खेड्या-पाड्यापर्यंत पोहोचले असून ग्रामीण भागातील अशिक्षित व गरीब रुग्णांचा ते गैरफायदा घेत असल्याचे दिसत आहे. तथाकथित डॉक्टर हे गरीब रुग्णांच्या घरी जाऊन आरोग्य तपासणी करतात. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसते. कुठलीही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी, अथवा पदविका नसते. केवळ गावातील प्रमुख व्यक्तीचा विश्वास संपादन करून आपली दुकानदारी चालविण्यात या डॉक्टरांचा हातखंडा असल्याचे दिसून येते. यावर एखाद्या सुशिक्षिताने विरोध केल्यास त्या गावातील इतर गरीब लोक सदर डॉक्टरांचीच पाठराखण करतानाचा अनेकांचा अनुभव आहे.पुसद तालुक्यात बेलोरा, फेट्रा, शेंबाळपिंपरी, चोंढी, जांबबाजार व गौळ खुर्द आदी सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तर पुसद येथे उपजिल्हा रुग्णालय आहे. तर नगर परिषदेतर्फे पुसद शहरात वसंतनगर व गुजरी चौक येथे उपकेंद्र चालविण्यात येतात. या उपकेंद्रांपैकी वसंतनगर येथील उपकेंद्रात सुविधांची वावा असून डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. ग्रामीण भागातील लोक प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात फार कमी प्रमाणात येताना दिसतात. या उलट स्थानिक पातळीवरील डॉक्टरांकडूनच उपचार करवून घेण्यात ते धन्यता मानतात. मात्र हे खरे डॉक्टर आहेत काय ? याची गरीब जनता शहानिशा करीत नाहीत. (प्रतिनिधी)
पुसदमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
By admin | Updated: June 7, 2015 00:02 IST