दाभा(पहूर) : ३१ डिसेंबरच्या रात्री ४० वर्षीय इसमाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करून प्रेत शेतशिवारात फेकल्याची घटना बाभूळगाव तालुक्यातील दाभा-कुरेगाव मार्गावर घडली. सुभाष नामदेव पवार (४०) अशी मृताची ओळख पटविली गेली. तो नजीकच्या येरडबाजार येथील रहिवासी आहे. सुभाषची आई व पत्नी कॅन्सरग्रस्त नातेवाईकाला पाहण्यासाठी आसेगाव (देवी) येथे गेले होते. गुरुवारी सकाळी सुभाषचा मृतदेह कुरेगाव मार्गावरील एका शेताजवळ बेवारस स्थितीत आढळून आला. त्याच्या छातीवर शस्त्राचे घाव आहे. पोलीस ओळख पटविण्यासाठी त्याच्या गावात लोकांना आणायला गेले असताना कुणीही सोबत आले नाही. तो मोलमजुरी करीत होता, असे सांगितले जाते. त्याच्या कुटुंबियांनी ओळख पटविली. बाभूळगाव पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास आरंभिला आहे. सुभाषचा खून नेमका कोणी आणि कशासाठी केला, याचे रहस्य गुलदस्त्यात आहे. ठाणेदार धंदरे गुन्ह्याचा तपास करीत आहे. (वार्ताहर)
इसमाचा खून करून मृतदेह फेकला
By admin | Updated: January 1, 2015 23:09 IST