लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्राने आजवर पाहिले नाही, अशा प्रकारचे अत्यंत गलिच्छ राजकारण भाजपकडून केले जात आहे. या राजकारणासाठी देशाच्या संस्था वापरल्या जात आहेत. स्वार्थ संपला की शिडीला लाथ मारायची सवय असलेल्या भाजपाला धडा शिकवू, असे सांगत शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून भाजपाचे गलिच्छ राजकारण वेशीवर टांगणार असल्याचे शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.भाजपाची भाषा आणि व्यवहार अत्यंत दुटप्पीपणाचा आहे. छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद भाजपा के साथ अशी टॅग लाइन घेऊन महाराष्ट्रात सत्तेसाठी प्रयत्न करणारी भाजपा कर्नाटकात शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान झाल्यानंतर मात्र मूग गिळून गप्प बसते. एवढे कशाला तिथले भाजपाचे मुख्यमंत्रीही क्षुल्लक बाब असल्याचे सांगतात आणि याविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिक मराठी माणसावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात. स्वाभिमान व्यक्त करणे देशद्रोह कसा, असा प्रश्नही सावंत यांनी या पत्रकार परिषदेतून व्यक्त केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी मागील सात वर्षांपासून आम्ही भांडत आहोत. याच मागणीसाठी मुख्यमंत्री दिल्लीला भेटून आले. कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी घोषणा व्हावी म्हणून शिवसेना नेते सुभाष देसाई यांनीही प्रयत्न केले. मात्र, भाजपाकडून प्रतिसाद मिळत नाही. महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला पळविले जात आहेत. तरीही महाराष्ट्रातील भाजपा नेते गप्प आहेत. दुसरीकडे मराठी माणूस आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याची मोहीम राबविली जात आहे. अशा स्थितीत सत्य नेमके काय आहे, हे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही शिवसंपर्क मोहीम सुरू केल्याचे सावंत यांनी सांगितले. कोरोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाखो लोकांचे प्राण वाचविले. आजवर झालेल्या प्रत्येक सर्व्हेत कार्यशील मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव आहे. जागतिक आरोग्य संस्थेनेही मुख्यमंत्र्यांच्या कार्याचे कौतुक केलेले असताना महाराष्ट्राला कमीपणा दाखविण्याचे काम भाजपाकडून होत आहे. भाजपाचे किरीट सोमय्या यांची यादी पहा, त्यांनी आरोप केलेल्यापैकी अनेक जण आता भाजपात गेले आहेत. तिकडे गेल्यानंतर चौकशी थांबते. ही कसली भ्रष्टाचारविरोधी मोहीम, असा प्रश्न करीत भाजपा महाराष्ट्राच्या हिताविरोधात कार्यरत आहे. त्यांना येथील माणसांशी, मराठी मातीशी काहीही देणे-घेणे नाही. केवळ राजकारण आणि सत्तेसाठी त्यांची उठाठेव सुरू असल्याचा आरोपही सांवत यांनी पत्रकार परिषदेत केला.पत्रकार परिषदेला आमदार संजय राठोड, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष कालिंदाताई पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
केंद्राकडे महाराष्ट्राचे ३० हजार कोटी येणेकोरोनाच्या संकटाचा आपण मोठ्या धीराने सामना केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही या उपाययोजनांकडे विशेष लक्ष होते. मात्र, केंद्रातील भाजपने महाराष्ट्राची नेहमी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. जीएसटी कायद्यानुसार महाराष्ट्राचा हिस्सा म्हणून केंद्राने ३० हजार कोटी रुपये द्यायला हवेत. मात्र, अद्याप ही रक्कम दिलेली नसल्याचे सांगत, हे एकप्रकारे जीएसटी कायद्याचे उल्लंघन असल्याचे खासदार अरविंद सावंत म्हणाले. मात्र, अशाही स्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महत्त्वाच्या गोष्टींना निधी कमी पडणार नाही, याची खबरदारी घेतली आहे.
पाठीत खंजिर खुपसणारा भाजपसारखा मित्र नकोच- शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही. समान किमान कार्यक्रम आखून आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत आहोत. पाठीत सुरा खुपसणाऱ्या भाजपपेक्षा शत्रू बरा, ही आमची भूमिका आहे. सेनेची पाळेमुळे घट्ट असल्यामुळे आगामी काळात सर्व पातळ्यांवर भाजपला पराभूत करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.