‘मेडिकल’च्या स्त्रीरोग विभागालाच प्रसवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 10:21 PM2018-12-12T22:21:49+5:302018-12-12T22:22:56+5:30

स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग विभागालाच प्रसवकळा सुरू झाल्या आहेत. येथील दाखल रुग्णांची संख्या आणि प्रत्यक्ष उपलब्ध असलेले डॉक्टर यात प्रचंड तफावत असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.

Birthday treatment for 'gynecological department' of 'Medical' | ‘मेडिकल’च्या स्त्रीरोग विभागालाच प्रसवकळा

‘मेडिकल’च्या स्त्रीरोग विभागालाच प्रसवकळा

Next
ठळक मुद्देडॉक्टरांच्या जागा रिक्त : क्षमता ९० रुग्णांची येतात २१० रुग्ण, जमिनीवर उपचाराची वेळ

सुरेंद्र राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग विभागालाच प्रसवकळा सुरू झाल्या आहेत. येथील दाखल रुग्णांची संख्या आणि प्रत्यक्ष उपलब्ध असलेले डॉक्टर यात प्रचंड तफावत असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. प्रशासनाने डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही संचालनालय स्तरावरून कुठलाच प्रतिसाद मिळत नाही. मध्यंतरी प्रसूतीसाठी आलेल्या महिलांनाच रेफर-टू करण्याची वेळ येथील डॉक्टरांवर आली होती.
जिल्ह्याची लोकसंख्या ही २७ लाखांच्या घरात आहे. १६ तालुक्यांचा विस्तीर्ण भौगोलिक परिसर असलेल्या जिल्ह्यात केवळ प्रसूतीसाठी यवतमाळ मेडिलकचमध्येच महिलांना दाखल केले जाते. या वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय पदवीसाठी दीडशे जागा मंजूर आहे. त्यानुसार स्त्रीरोग विभागात ९० खाटांचा वार्ड आहे. ९० रुग्ण दाखल राहतील या अनुषंगानेच येथील डॉक्टरांची पदे मंजूर आहे. प्रत्यक्ष मात्र २१० खाटा लावल्यानंतरही प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची संख्या वाढतच असते. अनेकदा एका खाटेवर दोन महिलांना किंवा चक्क जमिनीवर गादी टाकून उपचार केले जातात. स्त्रीरोग विभागात विभाग प्रमुख प्राध्यापक एक, सहयोगी प्राध्यापक तीन, सहायक प्राध्यापक सात, सिनीअर रेसीडेन्ट डॉक्टर सहा अशी पदे मंजूर आहे. यातील प्रत्यक्ष सहयोगी प्राध्यापक दोन कार्यरत आहे. सहायक प्राध्यापक केवळ एक कार्यरत आहे आणि सिनीअर रेसीडेन्ट दोन कार्यरत आहेत. ९० बेडसाठीच हा स्टाफ कमी पडणारा आहे. प्रत्यक्ष त्यांना २१० महिलांची देखभाल करावी लागते.
क्षमतेच्या दुप्पट काम असल्याने डॉक्टर आणि रुग्ण दोघांचीही चांगलीच तारांबळ उडते. अनेकदा प्रसूतीसाठी महिलेसोबत आलेले नातेवाईक आणि स्त्रीरोग विभागातील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांशी वादही होतात. सलग कित्येक तास काम करूनही येथील अकस्मात स्थिती कायम असते.
दिवसाला ५० महिला प्रसूतीसाठी दाखल होतात. त्यामध्ये रोज ३० प्रसूती होते. त्यापैकी दहा प्रसूती या शस्त्रक्रियेद्वारे कराव्या लागतात. उपरोक्त डॉक्टर कमी असल्याने कार्यरत असलेल्यांवर प्रचंड ताण येत आहे. यात डॉक्टर आणि गरोदर महिला या दोघांचेही हाल होत आहे.
ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक केंद्र नावालाच
ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर अपवादानेच प्रसूती केली जाते. शक्यतोवर ग्रामीण भागातील प्रत्येक तालुक्यातून प्रसूतीसाठी महिलांना थेट मेडिकलमध्ये पाठविण्यात येते. त्यामुळे कामाचा ताण वाढला असून साधन सामुग्री अपुरी पडत आहे.
असा हवा डॉक्टरांचा स्टाफ
रुग्णालयात येणाºया महिलांची संख्या लक्षात घेता २१० बेडसाठी किमान सहा सहयोगी प्राध्यापक, १४ सहायक प्राध्यापक आणि १२ रेसिडेन्ट डॉक्टरांची आवश्यकता आहे. यवतमाळ रुग्णालयात एमपीएससी उत्तीर्ण झालेले एमडी डॉक्टर येण्यास तयार नाही. येथील काहींनी नागपूर, औरंगाबाद, पुणे व इतर सोईच्या ठिकाणी बदली करून घेतली आहे. त्यामुळे आणखीच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
अध्यापन ठप्प असल्याने शैक्षणिक नुकसान
वैद्यकीय महाविद्यालय असल्याने येथे अध्यापन करणे याला प्राधान्य आहे. प्रत्यक्ष मात्र डॉक्टरांना अध्यापनासाठी वेळेच मिळत नाही. प्रसूती आणि स्त्री रुग्णांची तपासणी करण्यातच त्यांची संपूर्ण क्षमता खर्ची होते. यामुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. कसेबसे वेळ मारुन नेण्याचे काम येथील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापकांना करावे लागते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर नसल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना सावंगी, सेवाग्राम, नागपूर येथे रेफर केले जात होते. मात्र ग्रामीण भागातून आलेल्या गरीब महिलांना या ठिकाणी जाऊन उपचार घेणे शक्य होत नसल्याने आता पुन्हा कसेबसे यवतमाळातच प्रसूती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी काही खासगी डॉक्टरांना नियुक्त केले आहे.
सहा महिन्यांपासून औषधांचा तुटवडा
शासकीय रुग्णालयात राज्य शासन स्तरावरून मागील सहा महिन्यांपासून अत्यावश्यक औषधांचा पुरवठा बंद आहे. औषधी नसल्याने अनेकदा बाहेरुन आणावी लागते. आर्थिक क्षमता नसल्याने अनेकदा रुग्णांना हे शक्य होत नाही. जननी सुरक्षा व इतर योजनातून तात्पुरती आर्थिक तरतूद करून औषध खरेदी केली जाते. मात्र त्याचा पुरेसा फायदा होत नाही. एवढ्या अडचणीतून शासकीय रुग्णालयाचा प्रसूती विभाग कार्यरत आहे.

मेडिकलमध्ये स्त्रीरोग विभागात रुग्णांची संख्या पाहता डॉक्टर तुलनेने कमी आहेत. येथे डॉक्टर मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. शिवाय स्त्रियांसाठी स्वतंत्र रुग्णालयही मेडिकल परिसरातच उभारले जात आहे.
- प्राचार्य डॉ. अशोक उईके
आमदार, तथा अध्यक्ष अभ्यागत समिती,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.

Web Title: Birthday treatment for 'gynecological department' of 'Medical'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.