लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तब्बल दीड वर्षापासून विद्यार्थ्यांविना सुन्या सुन्या असलेल्या शाळा अखेर गुरुवारी पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने ‘जिवंत’ झाल्या. राज्य शासनाच्या निर्देशानुसार १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यात आले.पहिल्या दिवशी जिल्ह्यात ५०२ शाळांमध्ये विद्यार्थी आले. आठवी ते बारावीचे वर्ग गुरुवारपासून सुरू करण्याचे राज्य शासनाचे निर्देश होते. त्यानुसार जिल्हा परिषदेनेही शाळा उघडण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, सुरुवातीला केवळ ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे गुरुवारी शहरी क्षेत्रातील शाळा बंदच होत्या. जिल्ह्यात आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या एकंदर ९८५ शाळा आहेत. त्यापैकी गुरुवारी ५०२ शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसह सुरू झाल्या, तर ४८३ शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत.शाळा सुरू करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव आणि पालकांची संमती हे दोन निकष बंधनकारक करण्यात आले आहेत. या निकषांची पूर्तता न झाल्याने काही शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. मात्र, येत्या काही दिवसांत याही शाळा सुरू होतील, असा विश्वास शिक्षण विभागातून व्यक्त करण्यात आला. गुरुवारी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स पाळून बसविण्यात आले. आल्या आल्या प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायझर देण्यात आले. मास्क वापरण्याबाबत सूचना देण्यात आल्या. विशेष म्हणजे, शाळांकडून या निकषांचे पालन होतेय किंवा नाही, याची पाहणी करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनी दिवसभर विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी म्हणून यावेळी एका बाकावर एकच विद्यार्थी अशा स्वरूपात बैठक व्यवस्था करण्यात आली.