लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शाळेतील ‘हजेरी’ हा काही विद्यार्थ्यांसाठी मजेचा तर काही विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक भाग असतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू केल्याने खुद्द शासनच दररोज प्रत्येक शाळेची हजेरी घेत आहे. प्रत्येक शाळेकडून दररोज ऑनलाईन अहवाल घेतला जात आहे. मात्र दुर्गम खेड्यातील शाळांना हा अहवाल देणे अशक्य होत आहे. तर काही शहरी शाळा जाणीवपूर्वक अहवाल टाळत आहे. ऑनलाईन अहवाल मिळावा यासाठी राज्यस्तरावरून शिक्षकांपर्यंत लिंक पाठविण्यात आल्या आहे. बहुतांश शिक्षक ही लिंक रोज भरतही आहेत. परंतु या रोजच्या अहवालांपासून खुद्द जिल्हास्तरीय यंत्रणाच बाजूला ठेवण्यात आली. त्यामुळेच जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किंवा नगरपालिकांचे शिक्षण प्रशासन अधिकारी असा अहवाल मागविण्यातच येत नसल्याचा दावा करीत आहे. २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या दोन हजार ७१८ शाळांपैकी दोन हजार ६२५ शाळा सुरू झाल्या आहे. रोजचा अहवाल मिळत नसला तरी साप्ताहिक अहवाल मात्र गोळा होत आहे. त्यावरुन या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढत आहे. सुरुवातीला दहा टक्क्यावर असलेली उपस्थिती आता ५३.४२ टक्क्यांवर पोहोचली आहे.
ऑनलाईन अहवाल देण्यात अडचणी काय ? जिल्ह्यातील ९० टक्के शाळा खेड्यात आहे. त्यामुळे तेथे इंटरनेट उपलब्ध होत नाही. त्यातून दररोज ऑनलाईन अहवाल भरताना शिक्षकांना अडचणी येतात. शिवाय केवळ तीन तासाची शाळा असताना सुरुवातीचा अर्धा तास थर्मल गणने तपासणी, प्रत्येकाच्या तापमानाची नोंद घेणे यातच जातो. त्यानंतर अहवाल भरण्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागतो.
आपल्याला प्रत्येक शाळेचा दररोज अहवाल मागविण्यात आलेला नाही. केवळ शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी राज्य पातळीवरून अहवाल मागविण्यात आला होता. तो प्रत्येक शाळेने भरला आहे. त्यानंतर आपणही शाळांकडून अहवाल मागविलेला नाही. - प्रमोद सूर्यवंशीप्राथमिक शिक्षणाधिकारी.
पालिकेच्या शाळा दररोज भरत आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थितीही चांगली आहे. मात्र रोज अहवाल मागविण्याविषयी काहीच सूचना नाहीत. परंतु २७ जानेवारीला पहिल्या दिवशी प्रत्येक शाळेने उपस्थिती अहवाल ऑनलाईन भरला आहे. तरीही अधिक खातरजमा केली जाईल. - योगेश डाफप्रशासन अधिकारी, यवतमाळ न.प.
रोज ऑनलाईन अहवाल मागविण्यापेक्षा शिक्षण विभागाने केंद्र प्रमुखांचा व्हाॅटस्अप ग्रुप करून त्यावर केंद्रातील शाळांचा केवळ उपस्थितीचा फोटो मागवावा. केंद्र प्रमुख एकत्रित अहवाल वरिष्ठांना पाठवतील. याबाबत वरिष्ठांनी विचार करावा. - साहेबराव पवारशिक्षक, जिल्हा परिषद शाळा.