आर्णी : तालुक्याची वीज समस्या गंभीर झाली आहे. विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. याचा परिणाम पाणीपुरवठा योजनांवरही होत आहे. शिवाय उद्योग व्यवसायही प्रभावीत झाले आहे. या संदर्भात विद्युत कंपनीच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा करूनही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील वीजपुरवठा केव्हा खंडित होईल, याचा नेम राहिलेला नाही. वीज गूल झाल्यानंतर कित्येक तासपर्यंत सुरळीत होत नाही. वीजपुरवठा खंडित होण्याचे कुठलेही वेळापत्रक नाही. अतिशय कमी वेळ वीज उपलब्ध होत असल्याने नळयोजनेच्या पाण्याच्या टाक्या भरत नाही. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. शिवाय सिंचनावरही अनियमित विजेचा परिणाम होत आहे. विहिरींना भरपूर पाणी असतानाही केवळ विजेअभावी पिकांना पाणी देणे कठीण होवून बसले आहे. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यात विजेवर चालणारे अनेक उद्योग आहे. अनियमित वीज राहात असल्याने तेही प्रभावीत झाले आहे. अनेक युवकांनी कर्जाऊ रकमा काढून उद्योगाची उभारणी केली आहे. परंतु आवश्यक तेवढी आवक होत नाही. त्यामुळे बँकांकडून घेतलेल्या रकमांवरील व्याजाचा भरणा करणेही त्यांना जड जात आहे. कमी वेळात आवश्यक तेवढे उत्पादन किंवा काम काढता येत नाही. या शिवाय ग्रामीण भागातील व्यवसायही विजेअभावी अडचणीत आले आहे. विद्युत साहित्य विक्रीची दुकाने, झेरॉक्स सेंटर चालविताना ही समस्या प्रामुख्याने जाणवते. (तालुका प्रतिनिधी)
आर्णी तालुक्याला विजेच्या समस्येने ग्रासले
By admin | Updated: October 27, 2016 01:11 IST