...अन् तंत्राला झाला जाणीवेचा स्पर्श !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 10:20 PM2017-08-18T22:20:02+5:302017-08-18T22:20:33+5:30

पेराल ते उगवतेच. दु:ख सोसणारा माणूस कलावंताचे काळीज बाळगणारा असेल तर त्याच दु:खातून सुखाचे चित्र रेखाटतो. प्रशांत बनकर हा युवा छायाचित्रकार त्यातलाच.

... and touch the sensation of the technique! | ...अन् तंत्राला झाला जाणीवेचा स्पर्श !

...अन् तंत्राला झाला जाणीवेचा स्पर्श !

Next
ठळक मुद्देजीवन न्याहाळणारा छायाचित्रकार : भांबराजाच्या प्रशांतची आता चेन्नईपर्यंत भरारी

शिवानंद लोहिया।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरी : पेराल ते उगवतेच. दु:ख सोसणारा माणूस कलावंताचे काळीज बाळगणारा असेल तर त्याच दु:खातून सुखाचे चित्र रेखाटतो. प्रशांत बनकर हा युवा छायाचित्रकार त्यातलाच. बालवयातून ब्रेड विक्री, झाडूपोछा करता-करता त्याला जगण्याकडे बघण्याची ‘नजर’ लाभली. अंत:करणाला डोळे फुटले. अशाच अजाणत्या क्षणी हाती कॅमेरा आला अन् तंत्राला जाणीवेचा स्पर्श झाला... आज निष्णात फोटोग्राफर म्हणून नावाजलेल्या या युवकाची कहाणी खास जागतिक छायाचित्र दिनानिमित्त...
प्रशांतचा प्रवास भांबराजातून सुरू झाला. घरातअठराविश्व दारिद्र्य. वडील शेती करून गावात सायकलवर भांडी विकायचे. शेतीत फारसे उत्पन्न येत नव्हते. प्रशांतने शिक्षण घेऊन जीवनात वेगळे काही तरी करून दाखविण्याची जिद्द बाळगली. पण पैशांची चणचण अडथळा ठरत होती. म्हणून तो भांब, बेचखेडा, चांदापूर, हिवरी या गावांमध्ये दररोज सकाळी ब्रेड विकायचा. त्या मिळकतीतूनच शिक्षण सुरू ठेवले. भांबमध्ये सातवी झाल्यावर यवतमाळला जाऊन त्याने बीए केले. त्याचवेळी कामाचा शोध घेताना त्याला श्रीराम फोटोचे मनोज बुरकर यांनी मदतीचा हात दिला. फोटोग्राफीचे प्रशिक्षण दिले.
अपघाताने फोटोग्राफीच्या क्षेत्रात आलेला प्रशांत आता आपल्या कलेत निपुण बनलाय. त्याच्या फोटोग्राफीची झेप थेट चेन्नईपर्यंत पोहोचली आहे. कलात्मक छायाचित्रांमध्ये तज्ज्ञ झालेल्या प्रशांतने दहा हजारांच्या कॅमेºयापासून सुरू केलेला प्रवास आता ७ लाखांच्या कॅमेºयापर्यंत आला आहे. बदलत्या काळासोबत फोटोग्राफीही बदलली. प्रशांत म्हणतो, ‘आता फोटोग्राफीमध्ये गुप्तता राहिली नाही. तत्काळ रिझल्ट मिळतो. पूर्वी पूर्ण प्रक्रिया केल्याविना रिझल्ट कळत नव्हता. मात्र आज कलावंतांना भरपूर वाव आहे. असे असले तरी करिअर म्हणून हे क्षेत्र आजही तेवढेच आव्हानात्मक आहे. नोकरीची वाट पाहण्यापेक्षा अशी कला अवगत केल्यास रोजगारही मिळू शकतो.’

उत्तम कलावंत होण्यासाठी उत्तम माणूस असणे आवश्यक आहे. जगताना मिळणारे वाईट अनुभवच चांगली कला घडविण्यासाठी उपयोगी ठरतात. मी लहानपणापासून पाहिलेला संघर्ष आज फोटो टिपताना त्या-त्या क्षणाचे महत्त्व समजण्यास फायदेशीर ठरतोय.
- प्रशांत बनकर, छायाचित्रकार

Web Title: ... and touch the sensation of the technique!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.