फोन करूनही रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; भरपावसात दोन महिलांनी दिला ऑटोतच बाळांना जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 12:05 PM2022-07-15T12:05:13+5:302022-07-15T12:30:39+5:30

रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने व घरी बाळंत होण्याची शक्यता असल्याने दोन्ही गरोदर मातांना आशा वर्करने ऑटोने दवाखान्यात आणण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने दोन्ही बाळंत ऑटोमध्ये झाले.

ambulance did not arrive after calling lot of time, two women gave birth to babies in an auto during heavy rains | फोन करूनही रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; भरपावसात दोन महिलांनी दिला ऑटोतच बाळांना जन्म

फोन करूनही रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; भरपावसात दोन महिलांनी दिला ऑटोतच बाळांना जन्म

Next
ठळक मुद्देयवतमाळ जिल्ह्यातील धक्कादायक घटना : आरोग्य यंत्रणा खिळखिळी

मारेगाव (यवतमाळ) : सध्या सर्वत्र पावसाने हाहाकार उडाला असताना तालुक्यातील दोन आदिवासी महिलांनी भर पावसात बाळाला ऑटोतच जन्म दिल्याची दुर्दैवी घटना १२ जुलैच्या रात्री घडली. या घटनेने तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कशी खिळखिळी झाली आहे, ही बाबही या घटनांनी सिद्ध केली आहे.

पुरोगामी राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा अजूनही अशक्त आहे. हे वास्तव मांडणाऱ्या या घटना आहेत. आदिवासी कोलाम वस्ती असलेल्या रोहपट येथील चंदा (वय २५ वर्षे) या महिलेला अचानक प्रसूती वेदना होऊ लागल्या. याची माहिती आशा वर्करला देण्यात आली. आशा वर्करने रुग्णवाहिकेसाठी रुग्णालयाशी मोबाईलद्वारे संपर्क केला. परंतु रुग्णवाहिका वेळेपर्यंत रोहपट येथे पोहोचलीच नाही. गरोदर महिलेला वेदना असह्य झाल्याने नाइलाजाने तिला भर पावसात ऑटोने मारेगावला आणण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु अर्ध्या वाटेतच खैरागावसमोर एका निर्जळस्थळी भर पावसात रात्री ८ वाजता चंदाने बाळाला जन्म दिला. अशा अवस्थेतच तिला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुसरी दुर्दैवी घटना खैरागाव (भेदी) येथे घडली. वर्षा (वय २४ वर्षे) नामक महिला माहेरी बाळंतपणासाठी आली होती. १२ जुलैलाच याही महिलेला प्रसव कळा सुरू झाल्या. गावातील आशा वर्करमार्फत आरोग्य यंत्रणेला याची माहिती देण्यात आली. रुग्णवाहिका पाठविण्याची विनंती केली गेली. परंतु मुजोर आरोग्य यंत्रणेने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. याही महिलेने वाटेतच ऑटोमध्ये बाळाला जन्म दिला. या महिला ऑटोने रुग्णालयात येत असताना आणि वेदनेने तडफडत असताना या गरोदर महिलेसोबत आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी नव्हता.

आशा वर्कर, परिचारिका यांच्या वेतनावर शासन लाखो रुपये खर्च करते. परंतु हे कर्मचारी कधीही मुख्यालयी राहत नाहीत. वरिष्ठ अधिकारी मात्र या कर्मचाऱ्यांची कायम पाठराखण करतात. येथील रुग्णालयात सुसज्ज तीन रुग्णवाहिका उपलब्ध असताना गरोदर महिलांना रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले आहेत. लोकप्रतिनिधींनी व अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणी चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करावी व तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेत सुधारणा करावी अशी मागणी जनमानसातून होत आहे.

वेदनेने कळवळणाऱ्या गरोदर महिलेला हाकलून लावले

प्रसवकळा सुरू असताना आणि वेदनेने तडफडा सुरू असताना १० जुलै रोजी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकेने साधा हातही न लावता हाकलून दिल्याची तक्रार गर्भवती महिलेचा पती प्रफुल सदाशिव आदे (रा. मारेगाव) याने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली आहे. शेवटी आदे यांनी आपल्या पत्नीला खासगी वाहनाने यवतमाळ येथे सरकारी दवाखान्यात नेले. त्या ठिकाणी त्या महिलेने बाळाला सुखरूप जन्म दिला.

आशा वर्करचा फोन आला त्यावेळी १०८ ची रुग्णवाहिका पोहोचयला वेळ होता, तर १०२ ची ही रुग्णवाहिका वेळेत पोहोचली नसती. त्यामुळे घरी बाळंत होण्याची शक्यता असल्याने दोन्ही गरोदर मातांना आशा वर्करने ऑटोने दवाखान्यात आणण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने दोन्ही बाळंत ऑटोमध्ये झाले. बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहे.

- अर्चना देठे, तालुका आरोग्य अधिकारी.

Web Title: ambulance did not arrive after calling lot of time, two women gave birth to babies in an auto during heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.