वणी : येथील सेतू केंद्रात अर्ज स्विकृतीसाठी एकच खिडकी असल्याने अलोट गर्दी होत आहे़ केवळ अर्ज देण्यासाठी नागरिकांना तासन् तास रांगेत उभे रहावे लागते. मात्र महसूल प्रशासन नागरिकांचे हाल उघड्या डोळ्यांनी बघत असून त्यावर कोणतीही उपायोजना करायला तयार नाही़ याबाबत कोणता पक्ष किंवा संघटनाही आवाज काढायला पुढे सरसावत नाही़नुकतेच दहावी व बारावीचे निकाल लागले. विद्यार्थ्यांना शाळा, महविद्यालय प्रवेशासाठी विविध कागदपत्रांची गरज आहे़ ही सर्व प्रमाणपत्रे तहसील कार्यालयातूनच काढावी लागतात़ त्यासाठी सेतू केंद्रात अर्ज करावे लागतात़ मात्र येथे अर्ज स्विकृतीसाठी एकच टेबल लावण्यात आला. त्यामुळे नागरिकांना केवळ अर्ज दाखल करण्यासाठी संपूर्ण दिवस खर्च करावा लागतो़ किमान दोन महिन्यासाठी महसूल विभागाने अर्ज स्विकृतीसाठी जादा व्यवस्था करणे आवश्यक आहे़सातबारा, प्रतिज्ञापत्र, उत्पन्नाचा दाखला यासाठी एक टेबल व जातीचे प्रमाणपत्र, नॉनक्रीमीलेअर, राष्ट्रयीत्वाचे प्रमाणपत्र, यासाठी एक टेबल अशी व्यवस्था करण्याची नित्तांत गरज आहे़ खासगी सेतू केंद्रात चारपटीने अधिक पैसे द्यावे लागतात. त्यामुळे नागरिकांची लूट होत आहे़ प्रमाणपत्रांसाठी अर्ज दाखल झाल्यानंतर १५ दिवस प्रमाणपत्र मिळत नाही़ परिणामी काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे़ कोणत्या प्रमाणपत्रांसाठी कोणती कागदपत्रे जोडावी, याचा फलक सेतू केंद्राबाहेर लावण्यात आला आहे़ मात्र अर्ज स्विकारताना यादीपेक्षाही अधिक कागदपत्रे मागितली जात आहे. त्यामुळे नागरिकांची ऐनवेळी तारांबळ उडत आहे.यासाठी महसूल विभागाने आपले धोरण जाहीर करावे, अशी मागणी होत आहे़ उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जाणाऱ्या केसेसमध्ये तर त्रृटी काढण्याचा सपाटाच सुरू आहे़ लहान-सहान त्रृटी काढून प्रस्ताव प्रलंबित ठेवण्याकडे या विभागाचा कल वाढला आहे़ शासनाचा सेतू केंद्र स्थापन करण्याचा उद्देश बाजूला राहिला असून सेतू केंद्र नागरिकांना लुटण्याचा अड्डा बनला की काय ? असे वाटायला लागले आहे़ प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे अर्जाचे नमुने तहसील परिसरातच चढ्या दराने विकून नागरिकांना लुबाडले जात आहे़ नागरिकांच्या या हालअपेष्टांकडे लक्ष द्यायला महसूल अधिकाऱ्यांना सवड का मिळत नाही, हा प्रश्न अनुत्तरीत आहे़ आता जिल्हाधिकाऱ्यांनी तरी या बाबींकडे लक्ष देऊन जनतेला त्रासातून मुक्त करावे, अशी जनतेची रास्त अपेक्षा आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)
सेतू केंद्रात अलोट गर्दी
By admin | Updated: June 21, 2014 02:09 IST