संजय भगत
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : पुसद, महागाव आणि उमरखेड हे तीनही तालुके राजकीय व भौगोलिकदृष्ट्या एकमेकांत समाविष्ट आहेत. पुसद व उमरखेड या दोन्ही विधानसभा मतदारसंघांचे मिळून चार आमदार सध्या नेतृत्व करत आहेत. परंतु, त्यांचा उपयोग किती, हा प्रश्न आहे. जे शरद मैंद यांना जमते, ते त्यांना का जमत नाही, असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.
कोरोनाला रोखण्याच्या उपाययोजनांवरून हा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात विविध पक्षांचे आमदार, खासदार, मंत्री आपापल्या मतदारसंघात कोविड सेंटरच्या माध्यमातून जनतेला प्राथमिक आरोग्य सेवा देण्याच्या कामी गुंतले आहेत. पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी तर राज्यातील सगळ्यांना लाजवेल, असेच काम केले. तब्बल १,१०० बेडचे कोविड सेंटर उभारून त्यांनी सगळ्यांना तोंडात बोटं घालायला लावली. त्यांच्या हेतूबद्दल कुणीही शंका उपस्थित केली नाही. मी जर घरात बसलो, तर सामान्य जनतेने जायचे कुठे, असा प्रश्न आमदार लंके यांनी उपस्थित केला. हाच विचार प्रत्येक लाकेप्रतिनिधीच्या मनात का येत नसावा, असा प्रश्न आहे.
पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या आईची प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांनी पुसदच्या खासगी रुग्णालयात त्यांना भरती केले होते. तेथे त्यांना मिळालेली वागणूक सर्वश्रुत आहे. त्यामुळेच शरद मैंद प्रचंड संतापले. एवढेच नव्हे तर त्यांनी तक्रारही केली. कारवाई होत नसल्यास न्यायालयात जाण्याचाही तयारी केली. प्रसंग स्वत:वर बेतल्याशिवाय कोणीच पेटून उठत नाही, हेच या घटनेतून समोर आले. नंतर शरद मैंद एका ध्येयाने प्रेरित होऊन समोर आले. मोठ्या तिजोरीला हात न घालता, त्यांनी भारती मैंद या स्वतःच्या पतसंस्थेमार्फत गणोबा मंगल कार्यालय येथे सुसज्ज वास्तूत सर्व सोयींनीयुक्त ५० बेडचे कोविड सेंटर उभारले. या परिसरातील जनतेला हा मोठा आधार मिळाला आहे. ते आमदार नाही, खासदारही नाहीत. परंतु, संकटकाळी काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द, तळमळ त्यांच्या अंगी ठासून भरलेली असल्याचे यातून दिसून आले.
बॉक्स
उद्घाटनाला आमदारांची आवर्जून उपस्थिती
शरद मैंद यांनी पुसद येथे सुरू केलेल्या सेंटरच्या उद्घाटनाकरिता आमदार ॲड. नीलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा व बरेच पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. या तीन आमदारांसह उमरखेडचे आमदार नामदेव ससाणे यांनी मनोमन ठरवले, तरी पुसद व उमरखेड विधानसभा मतदार संघातील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळू शकतात. त्यामुळेच शरद मैंद यांनी जे केले, ते या आमदारांना का जमले नाही, हा प्रश्न आता दोन्ही मतदार संघातील नागरिकांना सतावत आहे.