व्यवहार प्रभावित : ऐन लग्नसराई व शेती हंगामाच्या तोंडावर चलन तुटवडालोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी शहरात विविध बँकांचे २० पेक्षा अधिक एटीएम आहेत. मात्र गेल्या आठ दिवसांपासून एटीएममध्ये कॅश नसल्याने व्यवहार प्रभावित झाले आहेत. त्यामुळे रक्कम काढण्यासाठी दररोज बँकापुढे पुन्हा एकदा रांगा लागत आहेत. वणीचे तापमान ४५ अंश सेल्सिअसवर पोहचले असताना सामान्य नागरिकांना भर उन्हात रक्कम काढण्यासाठी बँकापुढे रांगेत उभे राहावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या लग्नसराईचा मोसम असून लवकरच शेती हंगामही सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना पैशाची गरज पडते. मात्र बँकांमधून पैसेच मिळत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षी ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद करण्यात येत असल्याची घोषणा अचानक केली. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली. नोटाबंदीनंतर अनेक महिने नागरिकांना रक्कम मिळविण्यासाठी झुंजावे लागले. ५० दिवसांत परिस्थिती पूर्ववत होईल, असेही त्यावेळी पंतप्रधानांकडून सांगण्यात आले. मात्र सहा महिने लोटूनही ही समस्या सुटली नाही. मध्यंतरी परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाली होती. एटीएममधून समाधानकारक रक्कम काढता येत होती. मात्र ही अवस्था औटघटकेची ठरली. दर चार दिवसांनी एटीएममध्ये ठणठणाट निर्माण होत आहे. त्यामुळे रक्कम काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना ‘नो कॅश’ चा फलक वाचून परत यावे लागत आहे. शहरातील काही बँकांमधून ग्राहकांना १० हजार रुपयांपर्यंत रक्कम दिली जात आहे. गरज अधिक रकमेची असताना १० हजारांत व्यवहार कसा करावा, असा प्रश्न ग्राहकांसमोर उभा ठाकला आहे. सध्या लग्नसराई असून अनेक कु टुंबांमध्ये विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. लग्न म्हटले की, खर्चासाठी पैसे हवे असतात. परंतु एटीएममध्ये ठणठणाट असल्याने आवश्यक रक्कम मिळत नसल्याने लग्न घरीही पैशाची अडचण निर्माण झाली आहे. यंदा पावसाचे आगमन लवकर होणार असल्याने नव्या हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. बी-बियाणे, रासायनिक खते यासह शेतीसाठी आवश्यक साधनेही शेतकऱ्यांना खरेदी करावी लागतात. यासाठी पैशाची गरज असते. परंतु बँकांमधून आवश्यक रक्कमच मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ऐन हंगामात शेतकऱ्यांना पैशासाठी कुणापुढे तरी हात पसरावे लागत आहे. नोटाबंदीनंतर गेल्या सहा महिन्यांपासून अद्यापही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वणी शहरात किमान २० पेक्षा अधिक एटीएम आहेत. बहुतांश एटीएम हे राष्ट्रीयकृत बँकांचे आहेत. पैसे काढण्यासाठी ग्राहकांना बँकात रांगा लावण्याची गरज पडू नये म्हणून एटीएमची सुविधा देण्यात आली आहे. मात्र ही सेवा आता ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आरबीआयकडूनच बँकांना अपुरा चलन पुरवठाराष्ट्रीयकृत बँकांना नागपूर येथील भारतीय रिझर्व बँकेकडून चलन पुरवठा करण्यात येतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून अपुरा चलन पुरवठा होत आहे. जेथे दररोज किमान २५ लाख रुपयांची गरज असते, तेथे केवळ पाच लाख रुपयांचा पुरवठा करण्यात येत असल्याचे स्टेट बँकेचे येथील व्यवस्थापक अतुल देशपांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
वणीतील सर्व एटीएम झाले कॅशलेस
By admin | Updated: May 16, 2017 01:36 IST