डिझेलचे दर वाढल्याने शेतीची ट्रॅक्टर मशागत हाताबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 11:45 AM2021-01-28T11:45:30+5:302021-01-28T11:46:03+5:30

Yawatmal news डिझेलचे दर वाढल्याने मशागतीची किंमतही वाढविली आहे. हे दर शेतकऱ्यांना सध्या न परवडणारे असेच आहेत. मात्र, त्याला पर्याय नाही.

Agricultural tractors are out of hand due to increase in diesel prices | डिझेलचे दर वाढल्याने शेतीची ट्रॅक्टर मशागत हाताबाहेर

डिझेलचे दर वाढल्याने शेतीची ट्रॅक्टर मशागत हाताबाहेर

googlenewsNext
ठळक मुद्देपहिले नगदी पैसे द्या, नंतरच मशागत करणार

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : शेतशिवारामध्ये रासायनिक खतांचा वापर वाढत गेला. त्यासोबतच जमिनीमध्ये कडकपणा वाढला. अशा परिस्थितीत शेतजमीन भुसभुशीत करणाऱ्या बैलजोडीची ताकदही कमी पडण्यास सुरुवात झाली. यामुळे बैलजोडीऐवजी ट्रॅक्टरने मशागत करण्याचे प्रमाण वाढले. यातून शेतकऱ्यांचे मशागतीचे गणित परावलंबी झाले.

पूर्वी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात बैलजोड्या होत्या. अलीकडे त्याच्या रखवालीचा खर्च वाढत गेला. याशिवाय चारापाणी आणि रखवालीसाठी न मिळणारे मजूरवर्ग यामुळे शेतकऱ्यांनी बैलजोडी कमी केली. त्याची जागा झटपट काम पूर्ण करणाऱ्या ट्रॅक्टरने घेतली. दरवर्षी ट्रॅक्टरवर मशागतीची जबाबदारी वाढत आहे. आतातर संपूर्ण क्षेत्रच ट्रॅक्टरने मशागत होत आहे. बैलजोडीवर मशागत करायची असेल तर मोठा विलंब लागतो. याशिवाय शेतजमीन चिकट आल्यामुळे बैल पुढे सरकत नाही. आता ट्रॅक्टर हा अखेरचा पर्याय आहे. ट्रॅक्टर चालकांनी या क्षेत्रात मोठी कमाई असल्याने गावामध्ये ट्रॅक्टरची संख्या वाढविली आहे. डिझेलचे दर वाढल्याने मशागतीची किंमतही वाढविली आहे. हे दर शेतकऱ्यांना सध्या न परवडणारे असेच आहेत. मात्र, त्याला पर्याय नाही.

मशागतीचा एकरी खर्च मोठ्या प्रमाणात वाढला

- उन्हाळवाही करताना दोन फाळी अथवा तीन फाळी या अवजारांच्या मदतीने वाई करण्यात येते. यासाठी तासाप्रमाणे अथवा एकराप्रमाणे दर ठरले आहेत.

- उन्हाळवाई करण्यासाठी राजस्थानी आणि पश्चिम महाराष्ट्रातील ट्रॅक्टरचालकांनी जिल्ह्याकडे आगेकूच केली आहे. त्यांचे दर स्थानिकांपेक्षा अधिक आहे.

- रोटावेटर, वखरवाई, पेरणी या सर्वच बाबींचे दर ट्रॅक्टर चालकांनी वाढविले आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक गावात याचा दर वेगळा आहे.

माणसं काम करण्यासाठी उपलब्ध होत नाहीत. यामुळे सर्व काम यंत्रावर येऊन पाेहोचलं आहे. जमिनीचे क्षेत्र पाहता उपलब्ध यंत्रणा अपुरी आहे. यामुळे ट्रॅक्टर चालकांचे दर गगनाला भिडले आहेत. कर्जावर विकत घेतलेले ट्रॅक्टर किस्तीच्या रूपाने परतफेड होते. मात्र, नवीन ट्रॅक्टरचालक एकाचवर्षी सर्व पैसे वसूल करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.

- गजानन वानखडे, शेतकरी

यावर्षीसारखे नापिकीचे साल कधीच आले नाही. हातात पीक राहिले नाही. आता मशागत करायलाही खिशामध्ये पैसा राहिला नाही. वाई करण्यासाठी ट्रॅक्टरचालक नगदी पैसे मागताहेत. यामुळे वाई करण्यासाठी कर्जाऊ पैसे काढण्याची वेळ आली आहे.

- निखिल राऊत, शेतकरी

ट्रॅक्टर नव्याने घेतले आहे. त्याच्या किस्ती दर महिन्याला ठरलेल्या आहेत. यासाठी ज्या ठिकाणी मिळेल त्याठिकाणी काम करण्यासाठी ट्रॅक्टर चालक तयार आहेत. ट्रॅक्टरची घसाई, टायरच्या किमती, वाढलेले डिझेलचे दर या साऱ्या बाबींचा विचार करून मशागतीच्या किमती वाढल्या आहेत. याला आम्ही काय करणार?

- प्रवीण ठाकरे, ट्रॅक्टर मालक-चालक

Web Title: Agricultural tractors are out of hand due to increase in diesel prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती