लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासकीय कार्यालयात समारंभ साजरा केल्यास शिस्तभंग होतो. मात्र, ही कृती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केली आहे. या अधिकाऱ्यावर आता काय कारवाई होते, याकडे महामंडळातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, या समारंभाचा फोटो विविध माध्यमांवर टाकण्यात आला आहे.
एसटी महामंडळाच्या नियंत्रण समिती क्रमांक-३ चे (नागपूर) प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे यांच्या कार्यालयात २ जुलै २०२५ रोजी केक कापून समारंभ साजरा करण्यात आला. कार्यालयामध्ये वैयक्तिक समारंभ साजरा केल्यास कारवाई करण्यासंदर्भातील आदेश अलीकडेच निघाले आहे.
कारवाईची ही आहे तरतूदशासकीय कार्यालयात समारंभ साजरा केल्यास समज देणे, पदोन्नती थांबविणे, निलंबन किंवा सेवा समाप्ती यासारख्या शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे यांच्यावर यापैकी कोणती कारवाई केली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जनसेवेला प्राधान्य अपेक्षित
- कोणत्याही शासकीय कार्यालयात जनतेच्या सेवेला प्राधान्य देणे अपेक्षित आहे. पुष्पगुच्छ स्वीकारून स्वागतापर्यंत ठीक आहे, मात्र, काही कार्यालयांमध्ये कामकाजाच्या वेळात वाढदिवस साजरा करणे, केक कापणे, चहा, नाश्ता घेणे, फोटोसेशन करणे आदी प्रकार वाढत चालले आहेत.
- याला नियंत्रणात आणण्यासाठीच शिस्तभंगाच्या कारवाईचा नियम करण्यात आला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.
- एसटीच्या नियंत्रण समिती क्र.३ च्या प्रादेशिक व्यवस्थापकाने प्रशासनाच्या नियमालाच सुरूंग लावला आहे.
उपाध्यक्षांकडून प्रतिसाद नाहीनियंत्रण समितीचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी केलेल्या कृती संदर्भात विचारणा करण्यासाठी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांच्याशी संपर्क करण्यात आला. परंतु, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे श्रीकांत गभणे यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होणार, हे समजू शकले नाही.