लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सर्वात स्वस्त आणि आरामदायी प्रवास म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. यामुळे सर्वाधिक प्रवासी मिळविणाऱ्या रेल्वेवर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी होते. यासाठी नागरिक चार ते पाच महिने आधीच बाहेरगावी जाण्यासाठी बुकिंग करतात. कोरोना साथीपासून हे चित्र पार बिघडले आहे. बुकिंग झालेल्या एकूण प्रवाशांपैकी ८० टक्के प्रवासी आपला प्रवास रद्द करीत आहे. कोरोनाचे रुग्ण सर्वत्र वाढत आहेत. यामुळे धास्तावलेले नागरिक परगावी जाण्याचे टाळत आहेत. ॲडव्हान्स बुकिंग केल्यानंतरही कोरोना साथीमुळे अनेकांनी लांब पल्ल्याचे प्रवास रद्द केले आहेत. रोजमजुरीच्या शोधात पुणे आणि मुंबईकडे धाव घेणारा मोठा वर्ग थांबला आहे. यामुळे या मार्गावर असणाऱ्या प्रवासी स्टेशनलाही याचा फटका बसला आहे. पूर्वी दरदिवसाला तीन ते साडेतीन लाख रुपयांचे बुकिंग यवतमाळमधून होत हाेते. आता प्रवासी संख्या घटल्याने हे बुकिंग एक ते सव्वा लाख रुपयांपर्यंत खाली आले आहे. यातही अनेक प्रवासी वेळेवर आपला प्रवास रद्द करीत आहे. कोरोनाची स्थिती सुधारेपर्यंत रेल्वेच्या प्रवासाचे चित्र असेच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लोकप्रिय फेऱ्या प्रभावितजिल्ह्यातून पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे लोंढे विदर्भ एक्सप्रेस, गोंडवाना एक्सप्रेस या रेल्वे मार्गाने जात होते. पुण्यात आणि मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यातून याठिकाणाकडे जाणारे प्रवासी थांबले आहेत. परिणामी रेल्वेच्या फेऱ्यांना मिळणारी प्रवासी संख्या रोडावली आहे. यामुळे ॲडव्हान्स बुकिंग ऐनवेळी रद्द होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एकूण बुकिंग झाल्यानंतर वेळेपर्यंत ८० टक्के बुकिंग रद्द होत आहे. २० टक्केच प्रवासी रेल्वेने प्रवास करताना पाहायला मिळत आहे.
परीक्षेनंतर अवकळा
नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धा परीक्षेसाठी जिल्ह्यातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये गेले होते. रेल्वेचे तिकीट कमी असल्याने परीक्षेच्या काळात रेल्वे सर्वाधिक हाऊसफुल्ल होती. परीक्षा झाल्यानंतर रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या रोडावली आहे. नियमित प्रवास करणारे प्रवासीही थांबले आहे.