विधानसभा निवडणूक : भाजपाच्या मुलाखतीयवतमाळ : जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रासाठी भाजपाच्या निरीक्षकांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. तब्बल ६४ कार्यकर्त्यांनी आमदारकीच्या तिकिटावर दावा केला आहे. आर्णी, यवतमाळ आणि उमरखेडमधून सर्वाधिक कार्यकर्ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. भाजपाने उमेदवारीसाठी इच्छुकांना प्रस्ताव सादर करण्याची प्रथमच संधी दिली आहे. यापूर्वी केवळ सर्व्हेक्षणातूनच निवड केली जात होती. पहिल्यांदाच कार्यकर्त्यांना निरीक्षकांपुढे बंदद्बार मत मांडण्याची संधी देण्यात आली. निरीक्षक म्हणून भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी, माजी आमदार श्रीकांत जोशी यवतमाळात आले होते. येथील विश्रामगृहावर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी संघटनमंत्री रामदास आंबटकर सुध्दा उपस्थित होते. सकाळी ११ वाजतापासून कार्यकर्त्यांचे प्रस्ताव स्वीकारण्यास सुरूवात झाली. सर्व प्रथम राळेगाव विधानसभेसाठी चार उमेदवारांनी मुलाखती दिल्या त्यानंतर आर्णीसाठी २४, यवतमाळ आणि उमरखेडसाठी प्रत्येकी १५ उमेदवारांनी आपण इच्छुक असल्याचा प्रस्ताव ठेवला. याशिवाय भाजपच्या वाट्याल्या नसलेल्या वणी विधानसभेतून चार, दारव्हा दोन आणि पुसद येथून एका उमेदवाराने प्रस्ताव दिला. पक्षात प्रथमच खुल्या पध्दतीने उमेदवारीसाठी प्रस्ताव स्वीकारले जात असल्याने अनेक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. आपल्या समर्थकांसह इच्छुक उमेदवार दाखल झाले होते. उमेदवार निवडण्याची ही पारदर्शक प्रक्रिया मोडीत काढण्यासाठी परंपरागत उमेदवार असलेल्यांनी पध्दतशीरपणे आपल्या कार्यकर्त्यांनाच उमदेवारीसाठी दावा करण्याचा सल्ला दिला. जेणे करून अधिक दावेदार दिसल्याने संभ्रम निर्माण होईल. या स्थितीचा फायदा आपली तिकीट पक्के करण्यासाठी करता येईल, या पध्दतीने खेळी करण्यात आली. विशेषत: आर्णी, यवतमाळ, उमरखेड मध्ये व्यावसायिकदृष्ट्या एकाच चौकडीत असलेल्या नेत्यांनी ही व्युहरचना आखल्याची चर्चा भजापच्या गोटात आहे. पक्षाने पारदर्शक पध्दतीने उमेदवाराची निवड केल्यास आपले तिकीट कापले जाणार या भीतीतून हा प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
चार जागांसाठी ६४ दावेदार
By admin | Updated: August 5, 2014 23:34 IST