लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ : परिवहन नियमांचे पालन, रस्ते कर वसुली, वाहनांवर नियंत्रण, आदी कारणांसाठी ५९ वर्षांपूर्वी स्थापन मोटार परिवहन सीमा चौक्या बंद करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. चौक्या बंदच्या बदल्यात संबंधित संस्थेला ५०४ कोटी रुपये चुकते करावे लागतील. राज्यात २२ चौक्या एकाचवेळी बंद होणार आहेत. १९६६ मध्ये चौक्या स्थापन झाल्या. जीएसटी लागू झाल्याने आणि डिजिटल अंमलबजावणी उपाययोजना यामुळे आवश्यकता उरलेली नसल्याने त्या बंदचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी परिवहन विभागाला दिले होते.
संस्थेला द्यावी लागणार नुकसानभरपाई
महाराष्ट्रात मोटार परिवहन आणि सीमाशुल्क विभागाच्या एकत्रित तपासणी नाक्यांसाठी ‘इंटिग्रेटेड चेक पोस्ट’ प्रकल्प राबविण्यात आला. त्यासाठी मे. अदानी प्रा.लि. या संस्थेची नेमणूक करून त्यांच्यासोबत करार केला गेला. नाके बंदच्या निर्णयामुळे या संस्थेला नुकसान भरपाई म्हणून ५०४ कोटी रुपये दिले जाणार आहेत. यानंतर संबंधित तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता परिवहन विभागाच्या मालकीची होणार आहे.
या जिल्ह्यात आहे चेकपोस्ट
ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, लातूर, कोल्हापूर, यवतमाळ, सोलापूर या जिल्ह्यांत एकूण २२ सीमा चौक्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चौक्या बंदसंदर्भात निर्देश दिले होते.
महाराष्ट्र सरकारने सर्व चेक पोस्ट कायमस्वरूपी बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आंतरराज्य वाहतूक सुरळीत व्हावी, व्यावसायिक वाहनांच्या हालचालीतील अडथळे दूर व्हावे, हा यामागील उद्देश आहे. - प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री