उमरखेड : येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागांतर्गत रस्ता आणि पुलाचे काम न करताच कागदोपत्री काम पूर्ण दाखवून ४५ लाख रुपयांचा बिल काढण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. सदर कामे ३१ मार्चपूर्वीच पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले होते. हा प्रकार आमदार राजेंद्र नजरधने यांनी उघडकीस आणल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे.शासकीय योजना फस्त करणे आणि शासकीय तिजोरीवर डल्ला मारण्याचा सपाटा सध्या उमरखेड जिल्हा परिषद बांधकाम उपविभागात सुरू आहे. हा प्रकार एका कनिष्ठ अभियंत्याने केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे आता मे महिन्यात या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून हा प्रकार लक्षात आल्यानंतर आमदार राजेंद्र नजरधने या कामांची पाहणी केली. हे कामही निकृष्ट दर्जाचे लक्षात आले आहे.उमरखेड तालुक्यातील दहागाव जोडरस्ता, एम.बी. क्र.४३१२, चेक क्र.३०१२५६, अंबाडी गगनमाळ रस्ता ६०० मीटर, टाकळी-राजापूर रस्ता १५ लाखांचा धनादेश मजूर कामगार संस्थेच्या नावाने देण्यात आला आहे. भांबरखेडा येथील छोट्या पुलाचे काम आणि पंचायत समिती अंतर्गत ही कामे करण्याबरोबरच धनज-वानेगाव रस्ता झालेला नसताना या कामाचे देयक काढण्यात आले आहे. ही कामे कागदावरच प्रस्तावित असतानाच उमरखेड पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्याने तब्बल ४५ लाख रुपयांची देयके निकाली काढली आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे ४५ लाख रुपयांची सर्व कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण झाले असून या बाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी प्रमाणपत्रही दिले आहे. त्यामुळे या सर्व कामांची एम.बी.ही करण्यात येवून संबंधित ठेकेदाराच्या नावेही देयके अदा करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.परंतु ही सर्व कामे अद्यापही पूर्ण झाली नाही, तर काही ठिकाणी काम चालू आहे. टाकळी-राजापूर या १५ लाखांच्या डांबरीकरण रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. या बाबत गावकऱ्यांनी बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केली. तसेच आमदार नजरधने यांनाही ही माहिती दिली. त्यावरून त्यांनी या कामाची पाहणी केली आहे. सखोल चौकशी झाल्यावर घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)
काम न करताच काढले ४५ लाखांचे बिल
By admin | Updated: May 8, 2015 00:05 IST