आर्णी : खास दिवाळी सणासाठी विक्रीस आणलेल्या सुमारे ३०० महागड्या साड्या चोरट्याने आर्णी येथील एका कापड दुकानातून लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्याने साड्यांसोबतच गल्ल्यातील रोख २७ हजार ५०० रुपयेही लंपास केले. आर्णी शहरातील बसस्थानकाजवळ संस्कार कापड दुकान आहे. नेहमीप्रमाणे दुकान मालक प्रदीप राधेश्याम राठी यांनी रविवारी दुकान बंद केले. सोमवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे शटर उघडे दिसले. आत डोकावून बघितले असता दुकानातील कापड अस्ताव्यस्त दिसून आले. क्षणात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी या दुकानातून महागड्या ३०० साड्या लंपास केल्या असून गल्ल्यातील २७ हजार ५०० रुपयेही नेले. या दुकानात सुमारे चार लाख रुपयांची चोरी केल्याचे उघडकीस आले. वृत्त लिहेस्तोवर या प्रकरणी तक्रार झाली नव्हती. विशेष म्हणजे या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे. परंतु रात्री जाताना नेहमीप्रमाणे कॅमेरा बंद केल्याने चोरट्यांचा ठावठिकाणा लागला नाही. विशेष म्हणजे सदर दुकान बसस्थानक परिसरात असून पोलिसांची गस्तही असते. मात्र चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)
कापड दुकानातून ३०० साड्या लंपास
By admin | Updated: November 3, 2015 03:05 IST