धडक सिंचन : ६१ गावांसाठी मुदत वाढवली, सहापट अर्जांमुळे प्रशासनाची तारांबळ लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : धडक सिंचन योजनेतील ४८०० विहिरी आॅनलाईन पद्धतीने वितरित केल्या जाणार असून त्यासाठी तब्बल २५ हजार ७२९ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले. विहिरींच्या तुलनेत सहापट अर्ज आॅल्याने आता लाभार्थी निवडताना जिल्हा प्रशासनाला प्रचंड कसरत करावी लागणार आहे. राज्यातील आघाडी शासनाच्या कार्यकाळात धडक सिंचन विहिरींची योजना हाती घेण्यात आली. त्यावेळी प्रत्येक तालुक्यात एक हजार विहिरी देण्याचे उद्दीष्ट होते. मात्र शेतकऱ्यांची मागणी बघून आघाडी सरकारने ३०० वाढीव विहिरींचे उद्दीष्ट नव्याने मंजूर केले. नंतर वाढीव सिंचन विहिरींची योजना राबविताना मोठा गैरप्रकार होत असल्याचे आरोप झाले. हे प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले. त्यावर न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी निर्णय दिला. त्यात आॅनलाईन पद्धतीने ही योजना राबविण्याचे निर्देश दिले होते.न्यायालयाच्या निर्णयानंतर काही काळातच निवडणूक आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे ही योजना रखडली होती. आचारसंहिता संपताच शेतकऱ्यांकडून आॅनलाईन पद्धतीने या विहिरींसाठी अर्ज मागविण्यात आले. त्यासाठी १७ मेपर्यंत वेळ देण्यात आला होता. या निर्धारित वेळेत जिल्ह्यातील तब्बल २५ हजार ७२९ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले. आता हे सर्व अर्ज जिल्हा निवड समितीपुढे ठेवले जाणार आहे. त्यातून निकषानुसार प्राधान्यक्रमाने लाभार्थी निवडले जाणार आहे.
४८०० सिंचन विहिरींसाठी २६ हजार अर्ज
By admin | Updated: May 30, 2017 01:15 IST