प्रकाश लामणे - पुसदइंदिरा आवास घरकुल योजनेंतर्गत पुसद पंचायत समितीला १ हजार ८९५ घरकूल मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक घरकूल मंजूर होणारी पुसद पंचायत समिती एकमेव असून, ३५ गावातील अनुसूचित जाती, जमाती व अल्पसंख्यक नागरिकांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील अनुसूचित जाती, जमाती अल्पसंख्यक व इतरांना हक्काचे घर मिळून सामाजिक प्रवाहत सामील व्हावे यासाठी शासनाने इंदिरा आवास घरकूल योजना सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक घरकुल पुसद पंचायत समितीला मंजूर झाले आहे. तालुक्यात १८० गावे असून, एकूण ११९ ग्रामपंचायती आहेत. जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती नाईक यांच्या अध्यक्षतेखालील घरकूल योजनेतील लाभार्थ्यांचा मेळावा नुकताच झाला. यावेळी तालुक्यातील ३५ गावातील तब्बल १८९५ घरकुलांना मंजूरी देण्यात आली. या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाखा प्रमाणे अनुदान त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी महाराष्ट्र बँकेचा प्रतिनिधी मेळावा आमंत्रित करून सर्व लाभार्थ्यांचे झीरो बॅलन्सवर खाते उघडण्यात आले आहे. १८९५ लाभार्थ्यांमध्ये अनुसूचित जमातीचे १५९५, अल्पसंख्यक समाजातील ८६ व इतर २११ लाभार्थ्यांचा समावेश आहे. अनुसूचित जमातीतील घाटोळी येथे ८५, चोंढी-६१, उडदी-२६, धुंदी-३४, नाणंद ई.-१२६, येलदरी-१४१, धनकेश्वर-१७, सांडवा-८६, चिंचघाट-५३, जनुना-३५, बान्सी-९७, बेलोरा-११, वेणी खु.-५७, बोरगडी-६५, श्रीरामपूर-४, पिंपळखुटा-०३, काकडदाती-२१, हर्षी-११८, पारवा बु.-५१, शिळोणा-८४, पांढुर्णा बु.-४१, लाखी-९२, हनवतखेडा-८८, कोंढळी-५९, गौळ खु. - १२० आदी लाभार्थ्यांचा समावेश आहे. अल्पसंख्यक समाजातील धनकेश्वर येथे ६७, पार्डी येथे १९ लाभार्थी तर इतर समाजातील लाभार्थ्यांपैकी बुटी ई. ५६, जामनाईक क्र. १ - १६, वालतुर रेल्वे - ३०, वनवार्ला - ५२, नाणंद खु. -६, देवठाणा-१६, अडगाव -२९, शेलु बु. -६ असा लाभार्थ्यांचा समावेश आहे.
पुसद पंचायत समितीला १८९५ घरकूल मंजूर
By admin | Updated: August 5, 2014 00:00 IST