६६ दिवसांत १८ लाख लसीकरणाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 05:00 AM2021-09-27T05:00:00+5:302021-09-27T05:00:11+5:30

आराेग्य विभागाच्या संथगतीने चाललेल्या जहाजाच्या शिडात हवा भरण्यासाठी जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी नाेव्हेंबर अखेरचा अल्टिमेटम दिला आहे. याशिवाय आता जिल्हा परिषद, नगरपरिषदेची यंत्रणा साेबत घेण्याचे निर्देश दिले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ऑक्टाेबर महिन्यातच लसीकरण पूर्ण करायचे आहे. सध्या लसीची उपलब्धता पाहून लसीकरण केंद्रे वाढविण्यात येणार आहेत.

18 lakh vaccination challenge in 66 days | ६६ दिवसांत १८ लाख लसीकरणाचे आव्हान

६६ दिवसांत १८ लाख लसीकरणाचे आव्हान

Next

सुरेंद्र राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात काेराेना लसीकरण नाेव्हेंबर अखेरपर्यंत संपविण्याचा अल्टिमेटम जिल्हाधिकाऱ्यांनी आराेग्य यंत्रणेला दिला आहे. यासाठी शहरी भागात नगरपरिषदेची यंत्रणा साेबत घेण्याचे निर्देश आहेत. यामुळे काेराेना लसीकरणासाठी केवळ ६६ दिवस हातात असून १८ लाख ४ हजार १४० नागरिकांच्या लसीकरणाचे आव्हान उभे ठाकले आहे. फेब्रुवारी ते सप्टेंबर या सात महिन्यांत केवळ तीन लाख ३३ हजार ४७२ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. अनेक अडचणींना पार करत हा टप्पा गाठता आला आहे. 
काेराेना महामारीतून सुटका मिळवायची असेल तर लसीकरणच एकमेव पर्याय मानला जात आहे. जिल्ह्यात १८ वर्षांवरील  २१ लाख ३७ हजार ६१२  नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यापैकी ९ लाख ३३ हजार १५१ नागरिकांना पहिला डाेस देण्यात आला असून याची टक्केवारी ४३.६५ इतकी आहे. तर दुसरा डाेस हा ३ लाख ३३ हजार ४७२ नागरिकांना दिला असून त्याची टक्केवारी १५.६० इतकी आहे.  पहिला व दुसरा डाेस मिळून १२ लाख ६६ हजार ६२३ नागरिकांनी घेतला आहे. अजून पूर्ण लसीकरणाचा टप्पा गाठण्यासाठी बरीच मजल आराेग्य यंत्रणेला मारायची आहे. 
आराेग्य विभागाच्या संथगतीने चाललेल्या जहाजाच्या शिडात हवा भरण्यासाठी जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी नाेव्हेंबर अखेरचा अल्टिमेटम दिला आहे. याशिवाय आता जिल्हा परिषद, नगरपरिषदेची यंत्रणा साेबत घेण्याचे निर्देश दिले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ऑक्टाेबर महिन्यातच लसीकरण पूर्ण करायचे आहे. सध्या लसीची उपलब्धता पाहून लसीकरण केंद्रे वाढविण्यात येणार आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने अनेक जणांनी पहिला डोस घेऊन दुसरा डोस घेण्याची टाळाटाळ केली आहे. ९० दिवसांचा कालावधी पूर्ण होऊनही दुसरा डोस घेण्यास तयार नाही. याशिवाय पहिला डोस न घेणाऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागात जनजागृती करण्याची नव्याने गरज निर्माण झाली आहे. तरच निर्धारित वेळेत लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करता येणार आहे. 

लसीकरणाचे असे केले नियाेजन 
काेराेना लसीकरणाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आराेग्य विभागाने फेर नियाेजन केले आहे. आता पहिला फाेकस हा नगरपरिषद क्षेत्रात राहणार आहे. त्यासाठी मुख्याधिकारी, तालुका आराेग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांना संयुक्तपणे नियाेजन करायचे आहे. नगरपरिषदेची यंत्रणाही लसीकरणाच्या कामाला लागणार आहे. शहरात आवश्यकतेनुसार लसीकरण केंद्रे वाढविली जाणार आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक आराेग्य केंद्राअंतर्गत किमान तीन गावांत लसीकरण केले जाणार आहे. लस उपलब्ध असल्यास ही संख्या वाढविता येणार आहे. या नियाेजनाच्या आधारावर संपूर्ण जिल्ह्याचे लसीकरण पूर्ण केले जाणार आहे.

 

Web Title: 18 lakh vaccination challenge in 66 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.