लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घरफोड्यांचे कॅपिटल म्हणून यवतमाळ शहराची ओळख बनली आहे. बाजारात काही तासाच्या खरेदीसाठी सहकुटुंब घराबाहेर पडण्याची सोय राहिली नाही. अत्यंत वर्दळीच्या आर्णी मार्गावरील सत्यनारायण ले-आऊटमध्ये रविवारी तब्बल ११ लाखांची घरफोडी झाली. विशेष म्हणजे या घरी दहा दिवसापूर्वीच मुलाचा विवाह सोहळा पार पडला होता.गणेश शिवराम जाधव हे कुटुंबासह दारव्हा येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. रविवारी सायंकाळी ५.३० वाजता जाधव कुटुंब घराबाहेर पडले. रात्री १०.१५ च्या सुमारास घरी परत आले. त्यांनी घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडून आत प्रवेश केला असता धक्कादायक चित्र पहायला मिळाले. चोरट्याने किचनच्या खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश केला होता. त्याने बेडरुमच्या दाराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश घेतला. तेथे असलेले कपाट फोडले. नंतर वरच्या मजल्यावर असलेले कपाट फोडले. इतकेच नव्हे तर घरातील लाकडी कपाटही फुटलेले दिसले. त्यातील साहित्य अस्ताव्यस्त पडून होते. या चोरट्याने घरात प्रवेश करताना किचनच्या बाहेरुन ठेऊन असलेल्या कुदळीच्या सहाय्याने खिडकीचे ग्रील तोडले. हे दृश्य पाहून काही वेळ जाधव कुटुंबियांना जबर हादराच बसला. नंतर त्यांनी घटनेची माहिती अवधूतवाडी पोलिसांना दिली. ठाणेदार आनंद वागतकर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी श्वान पथकाला पाचारण केले. ठसे तज्ज्ञही तेथे आले. श्वानाने काही अंतरापर्यंत माग काढला. मात्र ते तेथेच घुटमळले. ठसे तज्ज्ञांना काही ठोस हाती लागले नाही. या चोरट्याने २७० ग्रॅम सोने व ८० हजार रुपये रोख रक्कम असा ११ लाखांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी गणेश जाधव यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.दहा दिवसांपूर्वीच झाला मुलाचा विवाहगणेश जाधव यांच्या मुलाचा २० नोव्हेंबरला विवाह झाला. नववधू व मुलाचे दागिने घरात ठेवलेले होते. चोरट्यांनी याच दागिन्यांवर हात साफ केला. तब्बल २७० ग्रॅम सोने त्यांच्या हाती लागले. इतकेच नव्हे तर या दागिन्यांची बिले चोरट्यांनी सोबत नेली आहेत. त्यामुळे पोलिसात तक्रार करताना जाधव यांच्याकडे दाखविण्यासाठीसुद्धा बिले उपलब्ध नाही.चोरट्याने बेन्टेक्स व गोल्ड कव्हरींग दागिने फेकलेचोरट्याने ज्या पद्धतीने हा गुन्हा केला. यावरून तो सराईत असल्याचे स्पष्ट होते. दागिन्यांचा डबा हाती लागला तेव्हा त्याने बेन्टेक्स आणि १ ग्रॅम गोल्ड कव्हरींग असलेले दागिने तिथेच फेकून दिले. फक्त सोन्याचेच दागिने त्याने घेतले. यावरून चोरटा सराईत असल्याचे दिसून येते. त्याने घरात खिडकीचे ग्रील तोडून प्रवेश केला. मात्र जाताना घराच्या मागचे दार उघडून निघून गेला. यावरून चोरी झाल्याची घटना शेजाऱ्यांच्या लक्षातच आली नाही.‘लोकमत’चे वृत्त ठरले खरेयवतमाळ शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या दोन टोळ्या सक्रिय आहेत. त्यांच्या गुन्ह्यांची पद्धत याचा सविस्तर वृत्तांत ‘लोकमत’ने सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अंकात दिला आहे. अगदी त्याच पद्धतीने सत्यनारायण ले-आऊटमध्ये घरफोडी झाली आहे. इतरही ठिकाणी होणाºया घरफोड्यांची पद्धत जवळपास मिळती जुळती आहे. पोलिसांनी त्यावरही लक्ष केंद्रीत करणे अपेक्षित आहे.
निवृत्त मुख्याध्यापकाकडे ११ लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 06:00 IST
गणेश शिवराम जाधव हे कुटुंबासह दारव्हा येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. रविवारी सायंकाळी ५.३० वाजता जाधव कुटुंब घराबाहेर पडले. रात्री १०.१५ च्या सुमारास घरी परत आले. त्यांनी घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडून आत प्रवेश केला असता धक्कादायक चित्र पहायला मिळाले. चोरट्याने किचनच्या खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश केला होता. त्याने बेडरुमच्या दाराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश घेतला. तेथे असलेले कपाट फोडले.
निवृत्त मुख्याध्यापकाकडे ११ लाखांची घरफोडी
ठळक मुद्देसत्यनारायण ले-आऊट : नवविवाहितेचे २७० ग्रॅम सोने लंपास