लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार :गावाजवळील तलावात बुडून येडशी कुंड येथील नरेश विठ्ठल कांबळे (३८) यांचा मृत्यू झाल्याची घटना १५ मे रोजी उघडकीस आली.गावाजवळील तलावात नरेश कांबळे पडल्याची माहिती मिळताच येडशी येथील पोलीस पाटील गणेश बारड यांनी वनोजा येथील साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो च्या आपत्ति व्यवस्थापन बचाव पथकला पाचारण केले. तलाव खोल असल्याने व पाणी गढूळ असल्याने त्यांचा मृतदेह स्थानिकांना मिळत नव्हता. बचाव पथकाचे सदस्य तत्काळ साहित्यासोबत घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांना सोबत घेऊन रेस्क्यू आॅपरेशन राबविले. पाणी गढूळ असल्याने व खोल असल्याने तसेच गाळ भरपुर असल्याने आॅपरेशन मध्ये व्यत्यय येत होते. यावेळी अवघ्या एका तासातच २० फुट खोल गढूळ पाण्यात गाळात फसलेल्या नरेश कांबळे यांचा मृतदेह पथकाच्या सदस्यांनी स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढला. यानंतर पोलिस प्रशासनाने रितसर पंचनामा केला. सदर रेस्क्यू आॅपरेशन राबविण्यासाठी पथकाचे राहुल साखरे, अमर खडसे, ओम वानखडे, सतिष गावंडे, सौरव इंगोले, प्रदिप सावळे, आदित्य इंगोले यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.याप्रसंगी शेलूबाजार चौकीचे जमादार आनिरुद्ध भगत, शिपाई गोपाल कव्हर उपस्थीत होते.
तलावात बुडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 12:36 IST