यंदा पोळा कसा साजरा करायचा, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये शेती व्यवसायाला खूप महत्त्व आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीवर वर्षभर राबणारा सर्जा-राजा अर्थात बैल अन् बैलजोडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षभर राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या सर्जा-राजाला किमान पोळ्याच्या दिवशी तरी विश्रांती मिळावी, तसेच त्याच्या श्रमाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी पोळ्याच्या दिवशी त्याला न्हाऊ घालून सजवितो व गावभरात फिरवून आणून पुरणपोळीचा नैवेद्य भरवितो. परंतु गत दोन वर्षांपासून या सणावर कोरोनाचे सावट आल्याने शेतकऱ्यांना हा सण उत्साहात साजराच करता येत नाही. गतवर्षी कोरोनाची स्थिती गंभीर होती. यंदा मात्र कोरोना नियंत्रणात असल्याने हा सण साजरा करण्याची मुभा मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु शासनाने यंदाही या सणावर निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजीचे वातावरण असून, यंदाही हा सण गावाच्या वेशीवरच साजरा करावा का, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.
००००००००
बैल सजावटीच्या साहित्याने फुलला बाजार
कोरोनामुळे सध्या तरी सण-उत्सवांना परवानगी नाही. त्यात पोळा सणाचाही समावेश आहे. परंतु सोमवार ६ सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या या सणानिमित्त बैल सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ फुलली आहे. सर्व शेतकरी बाजारातून बैलांच्या सजावटीसाठी साहित्य खरेदी करीत आहेत.