शिरपूर जैन : मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन - भेरा या ४.६० किलोमीटर रस्त्याचे काम वीस महिन्यांचा कालावधी झाला, तरीही अपूर्णावस्थेतच आहे. या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी शिरपूर येथील शेतकऱ्यांकडून होत आहे.
शिरपूर - भेरा या ४.६० किलोमीटर रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू करण्यात आले होते. यासाठी शासनाकडून दोन कोटी ४० लाख ८९ हजार रुपयांचा निधीसुद्धा मंजूर करण्यात आला होता. या कामाचा कार्यादेश १७ जुलै २०१८ रोजी देण्यात आला होता. त्यानंतर काही महिन्यांनी या रस्त्याच्या कामाला सुरुवातही झाली. यामध्ये शिरपूर फरशीनजिकचा नाल्यावर एक पूल बांधण्यात आला. रस्त्यावर माती व गिट्टी टाकून सपाटीकरण करण्यात आले. ही कामे जवळपास पावसाळ्यापर्यंत सुरू होती. या रस्त्याचे काम जुलै २०१९पर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र, आता मुदत संपूनही हे काम पूर्ण झालेले नाही. तसेच जुलै २०१९ ते जुलै २०२४पर्यंत देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदार यांची असल्याचेही फलकावर नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात या रस्त्यावर डांबरीकरण न झाल्याने काही महिन्यांपूर्वी रस्त्यावर टाकलेली खडी आता उखडली आहे. रस्त्यावरील खडी उखडल्याने शिरपूर येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत. या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मुदत संपूून देखभालीची वेळ सुरू झाली, तरीही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
" शिरपूर भेरा या रस्त्याचे काम बसलेल्या अवस्थेत मागील कित्येक दिवसापासून आहे. या कामातील रस्त्यावरील गीती उखडल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे काम त्वरित करण्यात यावे.
-आशिष देशमुख,
युवा शेतकरी शिरपूर जैन....
कोट: शिरपूर भेरा या रस्त्याचे काम किती झाले व का बंद आहे याबाबत सविस्तर माहिती घेतल्या जाईल.
आनंद राजूरकर कार्यकारी अभियंता,
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना.