रिसोड : स्थानिक नगरपालिकेत नव्याने रूजू झालेले मुख्याधिकारी नीलेश गायकवाड यांनी संपूर्ण विभागाच्या कर्मचाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन कार्यालयीन कामकामाजातील हयगय कदापि खपवून घेणार नाही, कर्मचाऱ्यांनी वेळेतच कार्यालयात हजर व्हावे, अशा सक्त सूचना दिल्या. यामुळे विशेषत: कामचुकार कर्मचाऱ्यांची पंचाईत झाली आहे.
रिसोड नगरपरिषदमध्ये अनेक विभागातील कर्मचारी कार्यालयात चक्क दुपारी हजेरी लावतात तसेच कार्यालयीन कामकाजाची वेळ संपण्याआधीच बाहेर पडत असल्याचे मुख्याधिकारी गायकवाड यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तातडीची बैठक घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात वेळेवर उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या. पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे सूतोवाच त्यांनी केले. त्यामुळे यापुढे नगरपरिषदेचे कार्यालयीन कामकाज चांगल्या पद्धतीने होण्याच्या आशा वाढल्या आहेत.
...............
कोट :
रिसोड नगरपरिषद कार्यालयातील विविध विभागांमध्ये कार्यरत अनेक कर्मचारी कार्यालयात उशिरा येत असल्याची बाब लक्षात आली. त्यानुषंगाने तातडीची बैठक घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना वेळेवर उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या.
नीलेश गायकवाड, मुख्याधिकारी, नगरपरिषद, रिसोड