लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: तालुक्यातील नागरतास येथील प्रमिलाबाई केशव देवळे (वय ५५) ही महिला ९ मार्च २१ रोजी गावाशेजारील नाल्याच्या काठावर मृतावस्थेत आढळली. या महिलेचा गळा आवळून आणि डोक्यात जड वस्तूने वार करून खून केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत महिला ही सहा महिन्यांपूर्वी खून झालेल्या विजय देवळे यांची आई होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना नागरतास गावानजीक असलेल्या नाल्याजवळ एक महिला मृतावस्थेत असल्याची माहिती मिळाली असता लगेच ठाणेदार आधारसिंग सोनोने व त्यांच्या सहकाऱ्यांनी सकाळी ९ वाजता घटनास्थळ गाठले. मृत महिलेचा दोरीने गळा आवळून व डोक्यात जड वस्तू मारून खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. लगेच वाशिम येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वानाने दर्शविलेला मार्ग व इतर पुराव्यांवरून पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून, वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.(प्रतिनिधी)
नागरतास येथील महिलेचा गळा आवळून खुन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 11:06 IST