वाशिम : औद्योगिक क्षेत्रात दिवसागणिक माघारत चाललेल्या जिल्ह्याला विकास पथावर मार्गस्थ करण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले आहे. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये छोटे- मोठे उद्योग उभे व्हावे, यासाठी नेमके काय करता येईल, उद्योजकांना कश्याप्रकारे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देता देतील, आदींचा आढावा घेण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी व्यापारी व संबंधित अधिकार्यांशी चर्चा केली. बैठकीत जिल्हा उद्योग मित्र, जिल्हा सल्लागार समिती, स्थानिक रोजगार समिती, आजारी उद्योग समिती तथा औद्योगिक विकास महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ह्यउद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी!ह्ण मराठीत प्रचलित असलेली ही म्हण जिल्हावासियांना मात्र प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली नाही. जिल्हा निर्मितीनंतर या भागात काही अपवाद वगळता मोठे उद्योगच उभे राहू शकले नाहीत. उभ्या झालेल्या छोट्या उद्योगांपैकी बहुतांश उद्योगांना अखेरची घरघर लागली आहे. परिणामी, जिल्हा औद्योगिक क्षेत्रात प्रचंड माघारला आहे. सर्वात भीषण बाब म्हणजे जिल्ह्याचा औद्योगिक विकास करण्याचा गाजावाजा करीत शासनाने वाशिम, मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव येथे निर्माण केलेल्या औद्योगिक क्षेत्रातही अद्याप मूलभूत सुविधा पोहोचू शकल्या नाहीत. परिणामी, उद्योजकांनी या क्षेत्रांकडे पाठ फिरविली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी उद्योजक, व्यापारी व अधिकार्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत औद्योगिक वसाहतींमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यावर सखोल चर्चा करण्यात आली. याबाबतचा अहवाल शासन दरबारी पाठविण्याचे यावेळी ठरले.
औद्योगिक विकासासाठी वाशिम जिल्हा प्रशासन सरसावले
By admin | Updated: November 19, 2014 02:32 IST