लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्य शासनाने वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात केमोथेरपी युनिटकरीता आवश्यक असलेल्या उपकरणांची खरेदी करण्यासाठी ३ लाख ४० हजार ३३५ रुपये खर्चास ८ आॅगस्ट रोजी मान्यता दिली होती. अद्याप निधीची तरतूद नसल्याने ही सुविधा वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध होऊ शकली नाही.राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील मंजूर कृती आराखडयामध्ये कर्करोग, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि स्ट्रोकच्या प्रतिबंध आणि नियंत्रण (एनपीसीडीसीएस) या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत ६५ लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. या अनुदानातून राज्यातील वाशिमसह २१ जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी युनिटसाठी लागणाऱ्या उपकरणांची खरेदी करण्याकरीता अंदाजित ६४.९७ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावास आॅगस्ट महिन्यात मान्यता मिळाली होती. वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात केमोथेरपी युनिसाठी सायटोटॉक्सिक कॅबिनेटसाठी २ लाख ६२ हजार ३३५ रुपये, तर इन्फ्युजन पंपसाठी ६० हजार आणि पल्स आॅक्सीमीटरसाठी १८ हजार रुपये, असे एकूण ३ लाख ४० हजार ३३५ रुपये खर्चास मंजूरी मिळाली होती. मध्यंतरीची प्रशासकीय दिरंगाई आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने ही प्रक्रिया ठप्प होती. त्यानंतरही शासनस्तरावरून निधी मिळाला नाही. त्यामुळे सदर सुविधा जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्याप उपलब्ध झाली नाही. वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात केमोथेरपी युनिटकरीता निधी मिळताच पुढील कार्यवाही होणार आहे. निधी मिळाल्यानंतर केमोथेरपी युनिट लवकरच सुरू होईल.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्यचिकित्सक,
वाशिम जिल्हा रुग्णालयात ‘केमोथेरपी’च्या सुविधेची प्रतिक्षा कायम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 12:55 IST