मंगरूळपीरच्या लग्नसमारंभात पायंडा : समाजसेवी ढोके, सोमाणी यांचा पुढाकारवाशिम : समाजात एकीकडे आजही स्त्रीभ्रूणहत्येला चालना दिली जात असताना दुसरीकडे मात्र मुलींच्या जन्मासाठी, तिच्या शिक्षणासाठी झटणारी मंडळीदेखील आपले हे कार्य मोठ्या दिमतीने पुढे रेटत आहे. जिल्ह्यातील मंगरूळपीरमध्ये १८ एप्रिल रोजी पार पडलेल्या लग्नसमारंभात याची प्रचिती घडली. परंपरेनुसार वर-वधूंनी लग्नाचे सात फेरे पूर्ण केल्यानंतर आठवा फेरा घेत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ची शपथ घेतली. हा आगळावेगळा पायंडा रुजविण्यासाठी समाजसेवी डॉ. दीपक ढोके, नीलेश सोमाणी यांनी पुढाकार घेतला.मुलगी ही माहेर आणि सासर अशा दोन्हीही घरांना प्रकाश देते. मुलगा वंश आहे तर मुलगी अंश आहे. मुलगा शान तर मुलगी आन आहे. असे असले तरी आजही स्त्री भ्रूणहत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. यामध्ये महिलांचाही सहभाग असणे, ही चिंतेची बाब आहे. अशिक्षितांप्रमाणे सुशिक्षितांमध्येदेखील हे प्रमाण वाढत आहे. मुलगी नकोच, ही भावना रुजत असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हे चित्र बदलण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चा नारा देशवासीयांना दिला आहे. शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवत डॉ. ढोके व सोमाणी यांनीदेखील या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन समाजाची नकारात्मक मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यानुसार, महत्वाकांक्षी पाऊल उचलत मंगरूळपीरमध्ये झालेल्या लग्नसमारंभात वरवधूंसोबतच उपस्थित वऱ्हाडी मंडळीलाही ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ची शपथ देण्यात आली. वर-वधूंनी सात फेऱ्यानंतर ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चा आठवा फेरा घेऊन या अभियानाला हातभार लावण्याकरिता पुढाकार घेतला. याप्रसंगी डॉ.सरोज बाहेती, डॉ. हरीश बाहेती, अभियंता प्रा. किशोर खंडारे, सुनील गट्टाणी, प्रा. गजानन वाघ, प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, प्रा. विनायक दुधे, दिलीप देशमुख, प्रमोद पेंढारकर, राधेशाम बलदवा, शशिकांत इंगोले यांच्यासह वधू-वरांचे आईवडील व वऱ्हाडी मंडळींची उपस्थिती होती. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ची अशी आहे शपथ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाचे जिल्हा संयोजक डॉ. दीपक ढोके यांनी वरवधूंसमवेत उपस्थित सर्व वऱ्हाडी मंडळींना दिलेली शपथ अशी, ‘मी वचनबद्ध आहे मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यास, मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यास, मुलगी म्हणजे परक्याचे धन ही मानसिकता बदलण्यास, मुलगा व मुलीमध्ये समानता प्रस्थापित करण्यास, बालविवाह व हुंडापद्धतीचा प्रखरपणे विरोध करण्यास, मुलींना संपत्तीमध्ये समान अधिकार देण्यास, प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान तपासणीचा विरोध करण्यास, स्त्रीभ्रूणहत्येला विरोध करण्यास मी वचनबद्ध आहे.
video - सातव्या फेऱ्यानंतर घेतला ‘बेटी बचाओ’चा आठवा फेरा!
By admin | Updated: April 20, 2017 02:07 IST