वाशिम : राजे वाकाटकांची राजधानी म्हणून ऐतिहासिक वारसा लाभलेली वाशिम नगरी आजमितीला पुरती भकास झाली आहे. वाढते प्रदूषण व धूलिकणांच्या वाढलेल्या प्रमाणाने यामध्ये अधिकच भर घातली आहे. घरात, कार्यालयांत आणि इतर मानवी वसाहतींत आढळणार्या धुळीत मानव आणि प्राण्यांचे केस, कपड्यांचे धागे, कागदाचे कण, शहरात सुरू असलेली बांधकाम, बाहेरच्या मातीतील क्षार आणि स्थानिक पर्यावरणात आढळणारे घटक अशा एक ना अनेक घटकांनी धुराचे लोट निर्माण होत आहेत. यातूनच मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.गेल्या दशकभरात शहरात जल आणि ध्वनी प्रदूषणाबरोबर वायुप्रदूषणाने कमालीची पातळी गाठली आहे. विशेषत: शहरात सुरू असणारी बांधकामे, उखळलेले रस्ते वायुप्रदुषणास कारणीभूत आहेत; शिवाय या धूळधाणीत सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइडसह प्रदूषकांचे प्रमाण सर्वाधिक असल्याची नोंद महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबधित कार्यालयात झालेली आहे. गत वर्षभरापासून नगरपालिकेने भुयारी गटार योजना व अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतलेले आहे. या कामासाठी शहरातील रस्त्याची चाळण करण्यात आलेली आहे. यातूनच धुळीचे साम्रज्य वाढले असल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे खोदून ठेवलेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी पालिकेकडे कुठलीच तजवीज नाही. त्यामुळे शहरात धुळीच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. धुळीमुळे शहरात श्वसनाच्या आजारातही वाढ झालेली आहे. विशेष करून लहान मुले व वृद्धांना या आजारांचा विळखा दिसून येत आहे. या धुळीतूनच सोडियम क्लोराइड, कॅल्शियम क्लोराइड, पोटॅशिएम, ब्रोमाइड व मॅग्नेशिएम क्लोराइड पसरतात. धूलिकण हे वातावरणातील शाश्वत घटक नसतात.
वाकाटकांची राजधानी धुळीने माखली
By admin | Updated: December 8, 2014 01:37 IST