लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनस्तरावरून राबविण्यात येत असलेल्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेची जय्यत तयारी करून १ जुलैपासून ही मोहिम हाती देखील घेण्यात आली; मात्र पावसाने ओढ दिल्याने मोहिमेस ‘ब्रेक’ लागला असून गेल्या २० दिवसांत जेमतेम अडीच लाख वृक्षांचीच लागवड करणे शक्य झाल्याची माहिती सूत्रांनी शनिवार, २० जुलै रोजी दिली.१ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्हाभरात राबविण्यात येणाऱ्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत जिल्ह्याला ४३ लाख वृक्षलागवड करण्याचे उद्दीष्ट मिळाले आहे. त्यात वनविभाग आणि सामाजिक वनिकरणला सर्वाधिक उद्दीष्ट असून नगर परिषदा, नगर पंचायती, ग्रामपंचायतींसह सर्व प्रशासकीय कार्यालयांनाही उद्दीष्ट विभागून देण्यात आले आहे. त्यानुसार, १ जुलैपासून युद्धस्तरावर वृक्षलागवडीला सुरूवात देखील करण्यात आली होती; मात्र लावलेल्या वृक्षांची समाधानकारक वाढ होण्याकरिता पाण्याची नितांत गरज भासत असून पाणी उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. दुसरीकडे भर पावसाळ्यात पावसाने ओढ दिल्याने गेल्या ८ ते १० दिवसांपासून वृक्षलागवड मोहिमेस प्रशासकीय पातळीवरून ‘ब्रेक’ देण्यात आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत केवळ मालेगाव, मानोरा आणि वाशिम या तीन तालुक्यांमध्येच प्रामुख्याने सर्वाधिक वृक्षलागवड झाली असून मंगरूळपीरमध्ये तुरळक प्रमाणात; तर कारंजा आणि रिसोड या दोन तालुक्यांमध्ये अगदीच कमी प्रमाणात वृक्षलागवड झाल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.
पावसाने ओढ दिल्याने वृक्षलागवड मोहिमेसही लागला ‘ब्रेक’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 16:32 IST