प्रशिक्षणाच्या सुरुवातीला कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शात्रज्ञ व प्रमुख डॉ.आर.एल. काळे यांनी रासायनिक खतांच्या संतुलित वापरासोबतच सेंद्रीय निविष्ठा तयार करून शेतीवरील खर्च कमी करावा, तसेच मानवी व जमिनीचे आरोग्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने एकात्मिक शेती संकल्पनेचा अंगीकार करून शेतकऱ्यांनी स्वत:सह राष्ट्राच्या हिताचा विचार करून, या पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. पीक शात्रज्ञ तुषार देशमुख यांनी महिलांना सेंद्रीय शेतीमधील गांडूळ खत, गांडूळ पाणी, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, नाडेप कंपोस्ट आदी तयार करण्याविषयी मार्गदर्शन केले, तसेच गांडूळ खत तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. शुभांगी वाटाणे यांनी तांत्रिक बाबींचा अवलंब करून सेंद्रीय खतनिर्मिती केल्यास गावामधील उकिरड्यामुळे होणारी अस्वच्छता थांबून स्वच्छ वातावरण निर्माण होऊन मानवी आरोग्यावर चांगला परिणाम होईल, असे सांगितले, तसेच सेंद्रीय निविष्ठा वापरामुळे मानवास आवश्यक असणारे पोषक अन्नधान्यही मिळेल, असे पटवून देत महिलांनी एकत्र येऊन सेंद्रीय खतनिर्मिती केल्यास या खताच्या विक्रीतून त्या सक्षम होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास करडा गावच्या कृषिसखी सुचिता देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले.
महिलांना घरगुती, शेत कचऱ्यातून कंपोस्ट खतनिर्मिती प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:39 IST