अनेक दिवसांपासून लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प पडले होते. आता उद्योग, व्यवसायांना शिथिलता दिल्याने शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. काही महिन्यांपर्यंत बंद झालेल्या कर्कश हॉर्नचे आवाज पुन्हा ऐकावयास मिळत आहेत. प्रशासनाच्या वतीने गर्दी होऊ नये याकरिता प्रत्येक चौकात शहर वाहतूक शाखेतर्फे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मोहीमही सुरू आहे तरी सुद्धा वाशिम शहरातील पाटणी चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्त्यावर उभे राहणारे फेरीवाले व रस्त्याच्या कडेला उभे राहणारे ऑटोचालकांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस विभागाच्या वतीने वेळोवेळी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात असताना काही जण नियमांचे उल्लंघन करीत असल्याने पोलिसांनाही नाकीनव आले आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
.............
चक्क रस्त्याच्या मधाेमध उभे राहतात फेरीवाले
शहरात फळविक्रेते आपल्या हातगाड्या चक्क रस्त्यात उभे करून वाहतूक प्रभावित करीत आहेत. वाहतूक विस्कळीत झाल्यानंतरही आपल्या हातगाड्या हटवित नसल्याने नागरिकांमध्ये राेष व्यक्त केल्या जात आहे. एखाद्याने हातगाडी बाजूला करायला सांगितल्यास वाद निर्माण हाेत आहेत.
रस्त्यातील ऑटाेमुळे वाहतूक प्रभावित
शहरातील अतिशय गजबजलेल्या पाटणी चौकातील रस्त्याच्या कडेला अनेक ऑटोचालक आपली वाहने उभे करीत असल्याने वाहतूक प्रभावित हाेत आहे. वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर ऑटो हटविण्यासाठी कोणीच दिसून येत नसल्याने वाहतूक प्रभावित होऊन चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शहर वाहतूक शाखेतर्फे वेळोवेळी ऑटोचालकांवर कारवाई करण्यात आलेले असताना हा प्रकार सुरूच दिसून येत आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेसी यांच्या सूचनेनुसार शहरात गर्दी हाेणार नाही याची काळजी घेतल्या जात आहे. गर्दी न होण्यासाठी कर्मचारी मेहनत घेत आहे. नागरिकांनी सुद्धा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे.
- नागेश माेहाेड, शहर वाहतूक शाखा निरीक्षक, वाशिम