कारंजा लाड (जि. वाशिम) : लग्नसंबंध जुळवून ठाणे (मुंबई) कडे जाणार्या स्कॉर्पिओ कारने ट्रकला मागून धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात एका महिलेसह ३ जण जागीच ठार, तर एक जण जखमी झाला. ही घटना २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील दोनद बु. गावाजवळ घडली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे (मुंबई) येथील रहिवाशी एमएच ४३, एन-५0९६ क्रमांकाच्या स्कॉर्पिओ कारने पूलगाव येथील मामाच्या मुलाच्या लग्नाचा संबंध जुळविण्यासाठी आले होते. हा संबंध जुळवून, २ फेब्रुवारी रोजी नागपूर ते औरंगाबाद द्रुतगती मार्गावरून ते स्कॉर्पिओ कारने ठाणेकडे परत चालले होते. दरम्यान, मार्गातील दोनद बु. गावाजवळ ओडी/७२६६ क्रमांकाच्या ट्रकला स्पॉर्किओ कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. परिणामी या घटनेत कारमधील शकुंतला प्रभाकर कांबळे (५५), दिनेश बाळू कात्रेकर (२८), चालक रूपेश घोले (२५) सर्व रा.लक्ष्मीनगर जुनी वस्तीच्या मागे ठाणे (मुंबई) हे जागीच ठार झाले तर सुरेश प्रभाकर कांबळे (२२) हा जखमी झाला. सर्वांना कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता, तिघांना मृत घोषित करण्यात आले तर सुरेश प्रभाकर कांबळे या जखमीवर कारंजा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे.हा अपघात एवढा भीषण होता की स्पॉर्किओ कार चक्कनाचूर झाली. अपघाताची माहिती मिळताच कारंजा येथील देवा राऊत व दोनद येथील ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेऊन मदतकार्य केले.
ट्रक व कारच्या अपघातात ३ जण जागीच ठार
By admin | Updated: February 3, 2015 00:06 IST