शिधापत्रिका नसलेल्या लाभार्थींचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 15:22 IST
शिधापत्रिका नसलेल्या लाभार्थींचे सर्वेक्षण मेडशी परिसरात केले जात आहे.
शिधापत्रिका नसलेल्या लाभार्थींचे सर्वेक्षण
लोकमत न्यूज नेटवर्कमेडशी (वाशिम) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर शिधापत्रिका नसलेल्या लाभार्थींनादेखील मोफत तांदूळ व अन्य धान्य दिले जाणार असून, या अनुषंगाने शिधापत्रिका नसलेल्या लाभार्थींचे सर्वेक्षण मेडशी परिसरात केले जात आहे. ३१ मे रोजी मेडशी, उमरवाडी, कोळदरा येथे सर्वे करण्यात आला.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मे पासून लॉकडाउन आहे. यामुळे उद्योगधंदे बंद असल्याने मजूर, कामगारांना रोजगार गेला. परराज्य तसेच महानगरात रोजगारासाठी गेलेले शेकडो कुटुंब आपापल्या गावात परतत आहेत. बेरोजगार, गोरगरीब नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था म्हणून शासनातर्फे गहू, तांदूळ मोफत दिले जात आहेत. शिधापत्रिका नसलेल्या विस्थापित कामगार, मजुरांनादेखील मोफत तांंदूळ, गहू मिळणार आहेत. परराज्य, महानगरातून परतलेल्या अनेक कुटुंबांकडे शिधापत्रिका नाहीत. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या नावावर मोफत धान्य मिळणार असल्याने यापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून महसूल विभागातर्फे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. मेडशी येथील तलाठी गजानन बानाईत यांनी गत तीन दिवसात सर्वे केला असता, कोळदरा येथील पाच कुटुंब, उमरवाडी येथील दोन कुटुंब आणि मेडशी येथील २५ कुटुंबाकडे सद्यस्थिती शिधापत्रिका नसल्याचे आढळून आले. ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, त्यांनी तातडीने माहिती द्यावी, अशा सूचनाही बानाईत यांनी केल्या. उमरवाडी येथे माजी जिल्हा परिषद सदस्य आत्माराम धंदरे, जामकर, तलाठी गजानन बानाईत, कोतवाल घनश्याम साठे व ग्रामस्थांची उपस्थिती होती.