लोकमत न्युज नेटवर्कउंबर्डाबाजार: येथील किशोर भिमराव कांबळे नामक अल्पभूधारक शेतकºयाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली.मूळचे कारंजा तालुक्यातील पिलखेडा येथील रहिवासी असलेले अल्पभूधारक शेतकरी किशोर कांबळे (३५) हे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून उंबर्डा बाजार येथे वास्तव्य करीत होते. त्यांच्याकडे सामुहिक क्षेत्रात पिलखेडा शेतशिवारात दोन एकर शेती असून, शेतीच्या उत्पन्नातून कुटूंब सांभाळणे कठीण असल्याने ते आॅटोरिक्षा चालविण्याचे कामही करीत होते. गतवेळच्या खरीप हंगामात नापिकीमुळे ते आर्थिक संकटात सापडले. यंदा शेती कशी करावी, घरचा खर्च कसा चालवावा, ही चिंता त्यांना सतावत होती. मृतक किशोर कांबळे यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, सहा वर्षीय मुलगा समीर तथा दोन वर्षीय मुलगी आचल असा परिवार आहे. या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास ठाणेदार दिगांबर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उंबर्डाबाजार पोलीस चौकीचे प्रल्हाद चव्हाण, दिलीप चव्हाण, मुरलीधर उगले करीत आहेत.
अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 14:49 IST