----------------
सर्पमित्रांकडून दोन सापांना जीवदान
वाशिम : मानोरा तालुक्यातील रोहणासह मंगरुळपीर शहरात सोमवारी आढळलेल्या दोन बिनविषारी सापांना निसर्ग स्पर्श फाउंडेशनच्या सर्पमित्रांनी सुरक्षित पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. रूपेश ठाकरे, उमेश जंगले, सुबोध साठे, गणेश गोरले, आदी सर्पमित्रांनी हे साप पकडले असून, याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली आहे.
--------
कवठळ येथील मतदान केंद्रांची पाहणी
कोठारी: आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनंजय जगदाळे यांनी सोमवारी कवठळ येथे भेट देऊन मतदान केंद्राची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांना कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन त्यांनी केले. यापूर्वी कोठारी येथे पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार रूटमार्चही काढण्यात आला होता
---------------
नुकसानभरपाईसाठी तहसीलदारांना निवेदन
इंझोरी : येथून जवळ असलेल्या तोरनाळा घोटी येथील शेतकरी भीमराव राठोड यांच्या शेतातील तुरीच्या गंजीला आग लागल्याने १५ क्विंटल तूर जळून खाक झाली. या घटनेचा पंचनामा तलाठ्यांनी केला असून, भीमराव राठोड यांनी सोमवारी या संदर्भात तहसील प्रशासनास निवेदन सादर करून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी केली आहे.