तोंडगाव येथील चंद्रभागा नदीवर बंधारा क्रमांक तीनचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार जि.प. जलसंधारण विभागातर्फे अंदाजपत्रक व टेंडर काढण्यात आले. त्यात काही जि.प. सदस्यांनी हस्तक्षेप करून ग्रामपंचायतचा खोटा ठराव घेतला व सदर बंधारा रद्द करावा, असे पत्र जि.प. जलसंधारण विभागाला देण्यात आले. तथापि, केवळ राजकीय व्देषापोटी हे काम थांबविण्यात आले असून ठराव क्रमांक नऊमधील नमूद ग्रामपंचायत सदस्यांपैकी आठ ग्रामपंचायत सदस्यांच्या खोट्या सह्या करून ठराव मंजूर करण्यात आला. संबंधित सदस्यांनी लेखी प्रमाणपत्र देऊन आपण ठराव क्रमांक नऊवर सह्या केल्या नसल्याचे नमूद करून सदरचा ठराव रद्द करण्यात यावा, असे लेखी प्रमाणपत्र दिले आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा गंभीर प्रकार असून शासकीय कामात अडथळा आणण्याचाच हा प्रयत्न आहे. सदर बंधाऱ्यास जिल्हा परिषदेने एकवेळ मान्यता दिल्यानंतर परत त्याविषयीचा ठराव जि.प.च्या सभेमध्ये ठेवण्याचे कोणतेही कारण नाही. बंधाऱ्यालगत असलेल्या शेतकऱ्यांची शेती ओलिताखाली येऊ नये, या उद्देशाने बंधाऱ्याचे काम थांबविण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. सदर काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.
तोंडगाव येथील बंधाऱ्याचे काम तत्काळ सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:42 IST