इंझोरी (वाशिम ): पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या नाल्या बुजल्यामुळे अडाण नदीच्या पुलावर पाणी साचले असून, वाहनचालकांना अडचणी येत असल्याने येथे अपघाताची भिती निर्माण झाली आहे.
कारंजा-मानोरा मार्गादरम्यान वाहणाऱ्या अडाण नदीवर सुरळीत वाहतुकीसाठी जवळपास ४५ वर्षांपूर्वी भव्य पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. हा पूल ४० फूट उंच आणि जवळपास १०० मीटर लांब आहे.शनिवारी इंझोरी परीसरात वादळी वाऱ्यासह पाऊस जोरदार बरसला. यामुळे सर्वत्र पावसाचे पाणी साचले. यामधे कारंजा ते मानोरा मार्गावर असणाऱ्या अडाण नदीवरील पुलावर गूडघाभर पाणी साचले. याच पाण्यामधून शेकडो वाहनचालकांना मार्गक्रमण करत आपली वाहने काढण्याची कसरत करावी लागली. यामधे अपघाताची भिती दिसत होती. या सर्व बाबीकडे सा. बा. विभागाचे मात्र दुर्लक्षित धोरण दिसत आहे. कारण या १०० मीटर लांब पुलावर मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी टाकलेल्या केबल लाइनमुळे पुलावर आधीपासून असलेल्या नाल्या संपूर्णपणे बंद झाल्या. परिणामी, या पुलावर पावसाचे जमा झालेले पाणी वाहनार कोठून? असा प्रश्न निर्माण झाला.