शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख व रिसोडच्या ठाणेदारात खडाजंगी, बचत गटाच्या गाडीला चलान केल्यावरून वाद
By दादाराव गायकवाड | Published: September 29, 2022 06:58 PM2022-09-29T18:58:56+5:302022-09-29T18:59:23+5:30
वाशिम: रिसोड पोलीस स्टेशनमध्ये बचत गटाच्या महिलांची गाडी चलन करण्यासाठी का आणली यावरून पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ...
वाशिम:
रिसोड पोलीस स्टेशनमध्ये बचत गटाच्या महिलांची गाडी चलन करण्यासाठी का आणली यावरून पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख व रिसोडच्या ठाणेदारांत गुरुवार २९ सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्येच खडाजंगी झाली. वाद विकोपाला गेल्याने रिसोड स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
रिसोड पोलीस स्टेशनमध्ये बचत गटाच्या महिलांची गाडी चलन करण्यासाठी का आणली यावरून शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख महादेवराव ठाकरे आणि रिसोड पोलीस स्टेशनो ठाणेदार देवेंद्रसिंग ठाकूर यांच्यात वाद झाला. दोघांदरम्यान काही वेळ संभाषण झाल्यानंतर गाडीचा दंड आकारल्याशिवाय ही गाडी पोलीस स्टेशनच्या आवारातून जाऊ द्यायची नाही, अशी भूमिका ठाणेदारांनी घेतली. त्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे आणि ठाणेदार ठाकूर यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरू झाली. त्यानंतरही ठाणेदारांनी संबंधित गाडीचा नियमानुसार दंड भरून घेतल्यानंतरच शिवसेना पदाधिकाऱ्यांना व वाहन चालकाला रिसोड पोलीस स्टेशनच्या आवारा बाहेर जाऊ दिले.
ग्रामीण भागातील महिलांची गाडी विनाकारण अडवून त्यांना दमदाटी करण्याचा प्रकार माझ्या कानावर पडला. त्याबाबत मी संबंधित वाहतूक पोलीस आणि ठाणेदारांकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
- महादेवराव ठाकरे,
शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट)
नियमानुसार आपण बचत गटाच्या गाडीवर दंडाची कारवाई करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याला सांगितले होते; परंतु शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ती गाडी तशी सोडून द्या्, असा आग्रह धरला होता यानंतर आपण नियमानुसार कारवाई केली. त्यामुळे त्यांनी आमच्यावर खोटेनाटे आरोप केले.
- देवेंद्र सिंह ठाकूर, ठाणेदार रिसोड