गेली दोन वर्षे संपूर्ण देश कोरोनाशी लढत आहे. या रोगाचा संसर्ग पसरू नये यासाठी फार मोठे निर्बंध लावले जात आहेत. सातत्याने होत असलेल्या लॉकडाऊनचा फटका मूर्ती कारागीरांना बसला आहे. गतवर्षी एक गाव एक गणपती ही संकल्पना फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागांमध्ये राबविण्यात आली. त्यामुळे अनेक गणेशमूर्ती कारागिरांनी मोठ्या मूर्ती बनवल्या होत्या, परंतु कोरोनाच्या निर्बंधांमुळे मोठ्या प्रमाणात बनवलेल्या मूर्ती विक्रीअभावी शिल्लक राहिल्या आहेत. याचा फार मोठा फटका मूर्ती कारागिरांना बसला आहे. याचाच परिणाम म्हणून याही वर्षी मूर्तिकारांनी छोट्या मूर्ती बनवण्यावर भर दिला आहे. कोरोनाचा फटका महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांनाही बसला आहे. कोरोनाच्या भीतीने सर्व मंदिरे बंद असल्याने पूर्णपणे शांतता पसरली आहे. राज्यात अत्यंत उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात गावागावात आणि घरोघरी बाप्पांच्या मूर्तीची स्थापना केली जाते. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान नातेवाइकांचे घरी येणे-जाणे होत असते. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातदेखील तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या गर्दीमुळे कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारनेसुद्धा गणेश मंडळांना विविध नियम लागू केले आहेत. त्यामुळे गणेश मूर्तिकार छोट्या मूर्ती बनविण्यावरच सध्या भर देताना दिसत आहेत.
छोट्या गणेशमूर्ती बनविण्यावर मूर्तिकारांचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:44 IST