वाशिम : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्मचार्यांकरिता उभारण्यात आलेले शासकीय निवासस्थान सध्या काही अपप्रवृत्तीच्या लोकांसाठी 'रम-रमा-रमी'चा मुख्य अड्डा बनले आहे. वापर सुरू होण्यापूर्वीच या निवासस्थानांमध्ये सर्वत्र घाण पसरलेली असून, इलेक्ट्रिक वायर, इलेक्ट्रिक बोर्ड अन् बटण, नळाच्या तोट्या चोरीला गेल्या असून, खिडक्यांच्या काचा दगड मारून पोडण्यात आल्या आहेत. 'लोकमत'ने गुरुवार, ३0 जुलैला केलेल्या 'स्टिंग ऑपरेशन'मध्ये हे वास्तव उजागर झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचार्यांना हक्काचे निवासस्थान मिळावे, या उद्देशाने शासनस्तरावरून कोट्यवधी रुपये निधी खचरून दोन वर्षांपूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक वर्ग १ चे अधिकारी आणि इतर कर्मचार्यांकरिता तीन निवासस्थानांची उभारणी करण्यात आली; मात्र या निवासस्थानांच्या मागील बाजूला लागूनच असलेली वसाहत सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याचा निर्वाळा देत रुग्णालयातील अधिकारी, कर्मचार्यांनी निवासस्थानांमध्ये राहण्यास असहमती दर्शविली आहे. यामुळे इमारत हस्तांतरणाच्या दीड वर्षानंतरही ही निवासस्थाने कर्मचार्यांअभावी भकास अवस्थेत उभी आहेत. ह्यस्टिंग ऑपरेशनह्णदरम्यान निवासस्थानांच्या आतील खोल्यांचे निरीक्षण केले असता, अनेक गंभीर बाबी आढळून आल्या. काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी निवासस्थानामध्ये ठिकठिकाणी शौचविधी उरकल्याचे अत्यंत शोचनीय स्थिती झाली आहे. यांसह स्वयंपाकघरातील नळाच्या तोट्या, इलेक्ट्रिक वायर, इलेक्ट्रिक बोर्ड, फ्यूज प्लेट्स चोरीला गेल्या आहेत. काही ठिकाणी दारूच्या बॉटल आणि कंडोमची रिकामी पाकिटे आढळून आली. ज्या मूळ उद्देशांनी कोट्यवधीची ही निवासस्थाने उभारण्यात आली होती, त्या उद्देशांना पूर्णत: हरताळ फासला गेला आहे. यासंदर्भात विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक सुरेखा मेंढे यांना विचारणा केली असता, त्यांनी सुरक्षेचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला. परिसरातील वसाहतींमधील अपप्रवृत्तीचा त्रास होऊ नये, यासाठी भिंतीची उंची वाढवून त्यावर काटेरी तार लावून मिळावी, यासह निवासस्थानांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा पुरवाव्या, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकार्यांकडे पाठपुरावा सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शासकीय निवासस्थानात चालतात अवैध धंदे
By admin | Updated: July 31, 2015 01:04 IST