सिंचनाच्या आधारे रबी पिकांसह भाजीपाला उत्पादन करून आर्थिक विकास साधण्यासाठी आसेगावातील शेतकरी अब्दुल जाहेद, अब्दुल सत्तार यांनी शेतात विहीर खोदत महावितरणकडे सौर कृषी वाहिनीत सौरपंप जोडणीसाठी २८ फेब्रुवारी २०१९ रोजी रीतसर अर्ज केला. त्यासाठी कोटेशनची १६ हजार ५६० रुपये रक्कमही भरली; परंतु दीड वर्षही या शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळाला नाही. वारंवार पायपीट करून प्रसारमाध्यमांचा आधार घेतल्यानंतर २१ महिन्यांनी ३० नोव्हेंबर २०२० रोजी त्यांच्या शेतात सौरपंप योजनेंतर्गत सौर पॅनल बसविण्यात आले. सौरपंप जोडणी मिळणार असल्याने अब्दुल जाहेद, अब्दुल सत्तार यांनी इतर शेतकऱ्यांच्या आधारे शेतात गहू पिकाची पेरणीही केली. आता हे पीक परिपक्व होण्याच्या स्थितीत आहे; तथापि, मोटरपंप बसविण्याची तसदी घेण्यात आली नसून, इतर शेतकरी आता त्यांना पाणी पुरविण्यास मागेपुढे पाहत असल्याने अब्दुल जाहेद, अब्दुल सत्तार यांच्या शेतातील गहूपीक पाण्याअभावी संकटात सापडले आहे. याची दखल घेण्याची मागणी त्यांनी महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांकडे शुक्रवारी (दि. २२) निवेदन सादर करून केली आहे.
२१ महिन्यांनी मिळाली सौरपंप जोडणी, तीही अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:26 IST