वाशिम : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांचा आधार क्रमांक आवश्यक आहे. पात्र लाभार्थींनी रेशनचा लाभ यापुढेही सुरू ठेवण्यासाठी तालुका पुरवठा विभागाकडे १५ जूनपर्यंत आधार क्रमांक सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे यांनी गुरूवारी केले.दारिद्ररेषेखालील तसेच उत्पन गटानुसार लाभार्थींना रेशनच्या अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. पात्र लाभार्थींना व्यवस्थितरित्या अन्नधान्याचा पुरवठा व्हावा तसेच बोगस लाभार्थींना चाप बसावा, या दृष्टिकोनातून प्रत्येक लाभार्थींचे आधार क्रमांक पुरवठा विभागाने मागविले आहे. वाशिम जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांनी १५ जून २०१७ पर्यंत आपले आधार क्रमांक पुरवठा विभागाच्या संबंधित यंत्रणेकडे सादर करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत आधार क्रमांक सादर न करणाऱ्या लाभार्थ्यांना रेशनचा धान्याचा लाभ मिळण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. त्यानुसार संबंधित लाभार्थीने शिधापत्रिका, आधार नोंदणी केल्याची स्लीप किंवा आधार नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यातील विनंती प्रत यासोबत मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट, प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला वाहन चालक परवाना, राजपत्रित अधिकारी किंवा तहसीलदारांच्या पत्रावर निर्गमित फोटो ओळखपत्र, फोटोयुक्त बँक पासबुक, पोस्ट विभागाकडून देण्यात आलेले निवासी पत्ता असणारे कार्ड, किसान फोटो पासबुक यापैकी एक कागदपत्र अशा एकूण तीन कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच लाभ मिळेल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी खंडागळे यांनी स्पष्ट केले.
‘आधार’ असेल तरच रेशनचे धान्य !
By admin | Updated: June 1, 2017 14:33 IST