वाशिम : राजभाषा मराठीचा प्रसार, प्रचार याबरोबरच तिचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने गेल्या वषार्पासून १ ते १५ मे असा राजभाषा मराठी पंधरवडा साजरा करण्याचा बिगुल वाजविला. यंदा मात्र आदर्श आचारसंहितेच्या धूमधडक्यात शासनाच्या निर्णयाची पुरती परवडच झाली. पंधरवाडा पुरता उलटून गेला असला तरी, जिल्ह्यातील कुठल्याही शासकीय अथवा निमशासकीय कार्यालयात मराठीच्या संवर्धनासाठी एकही का्र्यक्रम झाल्याचे दिसून आले नाही. धक्कादायक बाब म्हणजे या पंधरवाड्याबाबत लोकमतने शासकीय कार्यालयात केलेल्या सर्व्हेक्षणात अनेक कर्मचार्यांना या पंधरवाड्याची माहीती नसल्याची बाब समोर आली आहे. यंदा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पृष्ठभूमिवर शासनाच्या भाषा विभागाने राजभाषा पंधरवाडा साजरा करण्याबाबत कुठलेच स्पष्ट निर्देश दिले नव्हते. नेमक्या याच बाबीचा फायदा शासकीय कार्यालयातील बाबूगिरीने घेतला. पंधरवाडा संपल्यानंतर लोकमतच्या चमूने विविध शासकीय कार्यालयामध्ये जावून तेथील कर्मचारी व अधिकार्यांना या पंधरवाड्याविषयी विचारले त्यावेळी अनेकांकडुन मिळालेले उत्तरे धक्कादायक असेच होते. तब्बल ८७ टक्के कर्मचार्यांना या पंधरवाड्याविषयीची माहीतीच नव्हती. काहींनी आम्हाला आदेश नसल्यामुळे आम्ही राबविला नसल्याचे सांगीतले.
१७ वर्षापूर्वी म्हणजेच सन १९९७ मध्ये राज्य शासनाने १ मे हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्याचे फर्माण काढले होते. परंतु गत १२ वर्षात हा दिन केवळ सोपस्कारच ठरला. १ दिवसाच्या कार्यक्रमातून मराठीचे खाक संवर्धन होणार असा सुरही आळवल्या गेला. त्यामुळे शासनाने गत वर्षापासून १ मे ते १५ मे पर्यंत राजभाषा मराठी पंधरवाडा म्हणून जाहीर केला. या दिवसांमध्ये विविध कार्यक्रम घेण्याचे शासनाने सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयाला सुचविले मात्र, यंदा कुणीच या पंधरवाड्याबाबत फारसी उत्सुकता दाखविली नाही.