वाशिम : देशात आजपर्य॔त कापूस वगळता जनुकीय बदल बियाणे व इतर माल उत्पादनांवर तथा आयातीवर बंदी होती. परंतु मोदी सरकारने बारा लाख मेट्रिक टन जनुकीय बदल असलेल्या सोयापेंडची आयात करण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणीस सुरुवात केली. महाराष्ट्र आणि गुजरात बंदरात हा माल लवकरच उतरवला जाणार आहे. या निर्णयाचे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होणार आहेत. या निर्णयाचा भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून निषेध करण्यात आला आहे.
आल इंडिया पोल्ट्री पेंड असोसिएशनच्या मागणीनुसार हा निर्णय मोदी सरकारने घेतला. याचा थेट परिणाम सोयाबीनच्या भावांवर पडणार असून चुकीचा पांयडा सरकार पाडत असल्याची संतप्त प्रतिक्रिया भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी दिली आहे.
आयात करत असताना पशुखाद्य म्हणून आयातीस सरकारकडून परवानगी देण्यात आली, असली तरीही त्याचे परिणाम सोयाबीन बाजारावर होणार आहेत. ज्याप्रमाणे दाळवानाच्या चुकीच्या आयात धोरणाचा परिणाम दाळवर्गीय वानाच्या उत्पादनावर झाला. तसाच चुकीचा परिणाम तेलबिया उत्पादनावरसुद्धा भविष्यात होऊ शकतो.
या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संभ्रमात आहेत. शासनाने सरसकट जनुकीय बदल असलेल्या बियांण्याना परवानगी द्यावी त्यामुळे किमान शेतकऱ्यांचा तरी भविष्यात फायदा होईल. उत्पादन खर्च कमी होऊन हेक्टरी उत्पादन वाढेल. घेतलेला जी.एम. सोयापेंड आयातीचा निर्णय निषेधार्ह असल्याचे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे.