संतोष मुंढे / वाशिम
जन्मांध, वयाच्या बाराव्या वर्षीच मातृछत्र हरविले. वडील, भाऊ, बहिणीसह स्वत:च्या पदरी अडचणींचा डोंगर आला. त्यावर मात करत आपल्यातील कलागुणांना विकसित करण्याचे काम प्रवीण रामकृष्ण कठाळेने केले. जन्मांध असूनही आपण डोळस अन् नावाप्रमाणेच प्रवीण असल्याचे त्याने आजवरच्या आपल्या जीवनप्रवासातून सिद्ध केले आहे. इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण व संगीत विशारद असलेल्या २३ वर्षीय प्रवीणचे मूळ गाव आकोट. चंद्रमोळी झोपडीत जन्माला आलेल्या प्रवीणच्या कुटुंबात आई, वडील, भाऊ, बहीण. प्रवीण १२ वर्षाचा असताना त्याच्या डोक्यावरील मातृछत्र कॅन्सरच्या आजाराने हरविले. भावाच्या निधनाने प्रवीणच्या संगोपणाचा भार वृद्ध वडिलावर आला. त्याचे योग्य संगोपन व्हावे, त्याला शिकायला मिळावं म्हणून प्रवीणच्या वडिलांनी त्याला अकोल्याच्या अंध शाळेत टाकलं अन् प्रवीणचं आयुष्य बदललं. वडिलांची इच्छा पूर्ण करत मिळालेल्या संधीचे सोने करत प्रवीणने त्या शाळेतून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सोबतच संगीत विशारद होण्याचा बहुमानही पटकाविला. त्याने हजारो किलोमीटर प्रवास करुन जन्मांधाबरोबरच डोळसांच्या डोळ्य़ात अंजन घालण्याचे काम केले. वृद्ध वडिलांचा आधार बनलेल्या प्रवीणचे जीवन इतरांसाठी आदर्शवतच असे आहे.